केडीएमसीची टपऱ्या, स्टॉल्सवर कारवाई; निषेधार्थ दिव्यांग आणि चर्मकार स्टॉल्सधारकांचे आंदोलन
By प्रशांत माने | Published: February 11, 2024 07:16 PM2024-02-11T19:16:39+5:302024-02-11T19:16:48+5:30
आयुक्त निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन.
कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी कल्याणमधील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. त्यासाठी केडीएमसीकडून शनिवारपासूनच रस्त्यांमधील खड्डे भरण्याच्या कामांसह शहरात साफसफाई, स्वच्छतेचे काम देखील जोरात सुरू आहे. रविवारी रस्त्यालगत असलेल्या टप-या आणि स्टॉल्स हटविण्याची कारवाई केली गेली. या कारवाई विरोधात दिव्यांग आणि चर्मकार स्टॉलधारकांनी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निवासस्थाना समोर ठिय्या आंदोलन छेडत निषेध केला.
अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग आणि चर्मकार स्टॉल्सधारकांनी हे ठिय्या आंदोलन केले महापालिकेने दिव्यांगांना अनुदान दिले आहे. त्या अनुदानातूनच दिव्यांगांनी उदरनिर्वाहाकरीता स्टॉल्स उभारले आहेत. त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. महापालिका संबंधित स्टॉल्स बेकायदेशीर कसे ठरवू शकतात असा सवाल भोईर यांचा आहे. मुख्यमंत्री चांगले आहेत. मात्र त्यांच्या दौ-यानिमित्त महापालिका बेकायदेशीरपणे दिव्यांगांचे स्टॉल्स हटवून एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना बदनाम करीत आहे याकडेही भोईर यांनी यावेळी लक्ष वेधले. तर महापालिकेने चर्मकारांना दिलेले स्टॉल्सही हटविले आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी केला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा बनसोडे आणि भोईर यांनी घेतला. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस मनपा आयुक्तांच्या निवासस्थाना बाहेर पोहचले. आयुक्त जाखड या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्या निवासस्थानी नव्हत्या. उपायुक्त अवधूत तावडे यांनी चर्मकार आणि दिव्यांग संघटनेबरोबर चर्चा केली.
ज्या टप-या आणि स्टॉल्स बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आमची संबंधितांशी चर्चा झाली आहे अशी प्रतिक्रिया उपायुक्त अवधुत तावडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. संबंधित दिव्यांग आणि स्टॉलधारक हे आयुक्तांना भेटून चर्चा करणार आहेत. मनपाने केलेली कारवाई चुकीचीच आहे. आम्ही परवानगीची कागदपत्र अधिका-यांना दाखविली आहेत अशी प्रतिक्रिया राम बनसोडे आणि अशोक भोईर यांनी दिली.