अर्ध्या तासाच्या पावसाने गटाराचे पाणी रस्त्यावर; कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी पडली झाडे
By सचिन सागरे | Published: May 13, 2024 06:36 PM2024-05-13T18:36:13+5:302024-05-13T18:36:49+5:30
कल्याणसह आसपासच्या परिसरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कल्याण : कल्याणसह आसपासच्या परिसरात आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील विविध ठिकाणी झाडे देखील पडली. दुपारनंतर पडलेल्या सुमारे अर्ध्या तासाच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
आज सकाळपासूनच शहारात ढगाळ वातावरण असल्याने उकाडाही जाणवत होता. दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वारे वाहायला सुरुवात झाली. आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. अचानक जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही जण पावसाचा आनंद घेतत भिजले तर काहींनी आडोशाचा आधार घेतला. अवकाळी पावसामुळे फेरीवाल्यांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हालविण्यासाठी मोठी तारबंळ करावी लागल्याचे दिसत होते.
केडीएमसी क्षेत्रात अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी गटारातील काढलेला गाल गटाराच्या कडेला काढून ठेवण्यात आला आहे. हा गाळ उचलला न गेल्याने पावसामुळे हा गाळ पुन्हा गटारात वाहत गेल्याचे चित्र शहरात दिसून आले. तसेच, गटाराचे पाणी अनेक भागात रस्त्यावर वाहत होते. या पाण्यातूनच वाहनचालक आपली वाहने घेऊन जात होते.
पावसामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नियोजन देखील बिघडले होते. तर शहरातील विविध भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टीएनटी कॉलनी, नांदिवली, मानेरे गाव, कोकण वसाहत, चिकनघर, मुरबाड रोड आदी परिसरात झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.