Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 15:11 IST2018-08-18T14:09:11+5:302018-08-18T15:11:02+5:30
Asian Games 2018:भारतीय कबड्डी संघाने 28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत.

Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!
मुंबई - भारतीय कबड्डी संघाने 28 वर्ष आशियाई स्पर्धेतील आपली मक्तेदारी कायम राखली आहे. भारतीय कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदक नावावर केली आहेत. त्यात पुरूषांनी 7, तर महिलांनी दोन जेतेपद पटकावली आहेत. त्यामुळे जकार्तातही ही सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी ते सज्ज आहेत. भारतीय संघासमोर कडवे आव्हान असेल ते इराणच्या संघाचे. मागील 12 वर्षांत इराणच्या दोन्ही संघांची कामगिरी सातत्याने उंचावली आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारताची कसोटी लागणार आहे.
आशियाई स्पर्धेला शनिवारपासून सुरूवात होत असली तरी कबड्डीचे सामने 19 ते 24 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. भारत विरूद्ध जपान महिला संघांच्या लढतीने कबड्डीची सुरूवात होणार आहे. पुरूषांमध्ये भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. भारताच्या पुरूष व महिला संघांना अ गटात स्थान मिळाले आहे.
अशी आहे गटवारी
पुरूषः
अ गट- भारत, बांगलादेश, दक्षिण कोरिया, थायलंड आणि श्रीलंका
ब गट- इराण, पाकिस्तान, जपान, नेपाळ, इंडोनेशिया आणि मलेशिया
महिलाः
अ गट- भारत, जपान, थायलंड, श्रीलंका आणि इंडोनेशिया
ब गट- इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश आणि तैवान
भारतीय संघांची काही Interesting आकडेवारी
- 1990 मध्ये भारतीय पुरूष संघाने बांगलादेशला नमवून पहिले सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे 1990च्या आशियाई स्पर्धेतील भारताचे ते एकमेव सुवर्णपदक होते.
- भारतीय संघाने प्रत्येक आशियाई स्पर्धेत कबड्डीचे सुवर्ण नावावर कायम राखले आहे. भारताने 1994, 1998, 2002, 2006, 2010 आणि 2014 मध्ये बाजी मारली
- भारताने 1998 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 76-13 असा विजय मिळवला होता आणि आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक गुणांनी (63) मिळवलेला विजय आहे.
- भारताला 2014च्या अंतिम लढतीत इराणने विजयासाठी चांगलेच झुंजवले, परंतु भारताने 2 (27-25) गुणांच्या फरकाने बाजी मारली.
- भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार आणि माजी खेळाडू नवनीत गौतम यांच्या नावावर सर्वाधिक जेतेपद आहेत. 2006, 20010 आणि 2014च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे ते सदस्य होते.
- मागील चार आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.