आईची भेट घेवून येत असताना जळगावचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 13:23 IST2018-04-10T13:23:56+5:302018-04-10T13:23:56+5:30
नशिराबादजवळ महामार्गावर अपघात

आईची भेट घेवून येत असताना जळगावचा तरुण ठार
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १० - भुसावळ येथे वास्तव्याला असलेल्या आईला भेटून घरी दुचाकीवर परत येत असलेल्या अरुण प्रभाकर महाजन (वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) याला रविवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्गावर नशिराबादजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या अरुणचा सोमवारी दुपारी चार वाजता गोदावरी हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालय येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरुण महाजन हा पत्नी कल्पना व पाच वर्षाचा मुलगा स्वामी यांच्यासह अयोध्या नगर येथे वास्तव्य आहे. आई नर्मदा भुसावळ येथे वास्तव्याला असल्याने रविवारी तो दुचाकीने (क्र.एम.एच. १९ ए. एफ . ५९६४) तिला भेटायला गेला होता. तेथून सायंकाळी परत येत असताना राष्टÑीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अरुण याला लोकांनी तातडीने गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली.
केळीचे वेफर विक्रीचा व्यवसाय
अरुण व त्याची पत्नी अयोध्या नगरात केळीचे वेफर विक्रीचा व्यवसाय करायचे. वडील प्रभाकर महाजन यांचे निधन झाले आहे. भुसावळ येथे आई एकटीच राहते.
अयोध्यानगरात शोककळा
अरुणची पत्नी कल्पना व मुलगा स्वामी हे माहेरी यावल येथे गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. घरी कोणी नसल्याने अरुण उशिरापर्यंत घरी आला नाही याची कोणीच चौकशी केली नाही. सकाळी सात वाजता अरुणचा मोठा भाऊ गणेश यांना सकाळी व्हॉटस्अॅपवर अरुणचा जखमी अवस्थेतील फोटो व नुकसानग्रस्त दुचाकी दिसली. हा प्रकार पाहिल्यानंतर गणेश याने भाच्याला फोन करुन माहिती दिली. दोघांनी नंतर नशिराबाद पोलीस स्टेशन गाठले तेथून गोदावरी हॉस्पिटल गाठले. एक रात्र व अर्धा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अयोध्यानगरात शोककळा पसरली.