जळगावात वरिष्ठ लेखापालाचा स्टेट बॅँकेतच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:07 PM2018-09-07T16:07:26+5:302018-09-07T16:09:33+5:30
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक कुळकर्णी यांची गेल्या आठ दिवसांपासून प्रकृती बिघडलेली होती, तरीही अशा परिस्थितीत त्यांना औरंगाबाद येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. तेथून परत आल्यानंतर गुरुवारी बॅँकेत त्यांचा कामाचा पहिलाच दिवस होता.
दुपारी तीन वाजता जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना घाम आला. त्यानंतर चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅँकेतील सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जळगाव शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी कुळकर्णी यांना मृत घोषित केले.
कुळकर्णी यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर स्टेट बॅँकेच्या अन्य शाखेतील अधिकारी व कर्मचाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुळकर्णी यांच्या पत्नी व मुलगीही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, मात्र त्यांना कुळकर्णी यांच्या मृत्यूची माहिती उशिरापर्यंत देण्यात आली नव्हती. त्यांच्या पश्चात पत्नी छाया, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित आहे तर मुलगा अक्षय हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.