मोदी सरकारची आश्वासनपूर्ती म्हणजे लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं : खासदार शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:39 PM2018-09-16T21:39:10+5:302018-09-16T21:46:32+5:30
या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
जळगाव : साडे चार वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, उद्योजकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित आश्वासने दिले. मात्र या सरकारचं काही खरं नाही. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरचं खरं अशी या सरकारची अवस्था आहे. राजकर्ते आपले कर्तव्य विसरले असल्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
भडगाव येथे सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा रविवारी दुपारी ३ वाजता झाला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या भडगाव येथील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
दोन वर्षात १३ हजार शेतकºयांच्या आत्महत्या
शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाला भाव मात्र मिळत नाही. त्यामुळे या दोन वर्षात तब्बल १३ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यकर्ते यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही हे आत्महत्या वाढण्याचे मूळ कारण आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आजही निम्मे शेतकºयांना याचा लाभ झालेला नाही.
७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली
पंतप्रधान मनमोहनसिंग व आपण केंद्रीय कृषी मंत्री असताना यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. त्यानंतर पंतप्रधान व आम्ही त्या कुटुंबियांची भेट घेतली होती. थकीत कर्जाची बँकेची नोटीस हे आत्महत्येचे मूळ असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी मंत्रीमंडळाची बैठक घेऊन ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पिक कर्ज १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणले तसेच नियमित फेड करणाºयांना शून्य टक्के दराने कर्ज वितरण केल्याचे त्यांनी सांगितले.
मोदींच्या राज्यात जीव देण्याशिवाय पर्याय नाही
ज्यांच्या हातात सरकार आहे ते नुसते घोषणा करीत आहेत. मात्र या घोषणांची अंमलबजावणी मात्र करीत नाहीत. मोदी सरकारच्या राज्यात शेतकरी व कष्टकºयांना जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याचा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.