MP stuck in Illegal sand traffic; Administration took action against 14 vehicles | अवैध वाळू वाहतुकीत अडकला खासदारांचा ताफा; प्रशासनाने तत्परतेने केली १४ वाहनांवर कारवाई   

ठळक मुद्देपरभणीचे खासदार शिवगाव दौ-यावर आले होते. या वेळी अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी झाली. यानंतर तहसीलदार अश्विनी डमरे आणि पोलिस पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी शुक्रवारी अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांची धरपकड सुरू केली.  

कुंभारपिंपळगाव (जि.जालना)  : घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू तस्करी करणारे महसूल प्रशासनालाही जुमानत नाही. मात्र, परभणी लोकसभा मतदार संघातील शिवणगाव (ता.घनसावंगी, जि. जालना ) दौ-यावर आलेले खासदार संजय जाधव यांचा ताफा अवैध वाळू वाहतुकीमुळे अकडला. या प्रकारानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारी चौदा वाहने ताब्यात घेतले.

सूत्रांनी सांगितले, की या परिसरात गोदावरी पात्रातून होणा-या अवैध वाळू वाहतुकीबाबत जिल्हा अधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी गेल्या आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष कारवाईचे प्रमाण खूपच कमी आहे. गुरुवारी परभणीचे खासदार शिवगाव दौ-यावर आले होते. या वेळी अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांमुळे रस्त्यावर कोंडी झाली. त्यात खासदार जाधव यांची गाडी काही वेळ अडकून पडली. या प्रकाराबद्दल त्यांनी महसूलच्या अधिका-यांना सुनावले. दरम्यान,  तहसीलदार अश्विनी डमरे आणि पोलिस पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी शुक्रवारी अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांची धरपकड सुरू केली.  

वाळूने भरलेले नऊ हावया घनसावंगी तहसील कार्यालयात तर पाच टॅक्टर कुंभारपिंपळगाव येथील पोलीस चौकीत उभी करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाळूची किमंती काही लाखांच्या घरात आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू तस्कारांचे धाबे दणाणले आहेत. एरवी सर्वसामान्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी महसूल प्रशासन वाळू तस्करांवर कारवाई करत नाही. मात्र, खासदारांची गाडी अडकल्यानंतर जोरदार मोहीम राबवून चौदा वाहने जप्त केली. त्यामुळे प्रशासकीय अधिका-यांच्या या दुटप्पी भूमिकेची परिसरात चर्चा सुरू आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.