CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे संपूर्ण गाव सील; संपर्कातील ४९ नागरिक क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 06:47 PM2020-04-22T18:47:02+5:302020-04-22T18:49:44+5:30
खोकला, तापीचा त्रास होऊ लागल्याने शेलवडा (ता.परतूर) येथील महिलेवर ६ ते १० एप्रिल या कालावधीत परतूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.
जालना/ परतूर : परतूर तालुक्यातील शेलवडा येथील एक ३९ वर्षीय महिला मंगळवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर प्रशासनाने बुधवारी शेलवडा गाव पूर्णत: सील केले. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांपैकी १७ जणांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या पथकामार्फत शेलवडा येथील ८० कुटुंबातील ५६० जणांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे.
खोकला, तापीचा त्रास होऊ लागल्याने शेलवडा (ता.परतूर) येथील महिलेवर ६ ते १० एप्रिल या कालावधीत परतूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने १० एप्रिल रोजी त्या महिलेला जालना येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथून नंतर १३ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तातडीने त्या महिलेची कोरोना तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले. मात्र, १४ एप्रिल रोजी महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर दुसºया वेळेस २० एप्रिल रोजी पुन्हा स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, त्या महिलेचा दुसरा अहवाल २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आणि सर्वांचेच धाबे दणाणले.
त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्या महिलेच्या संपर्कात ४९ नगारिक आले असून, ८ जण अधिक रिस्कचे तर इतर ४१ जण कमी रिस्कचे आहेत. त्यातील १२ जणांना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांना आणण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रशासनाने बुधवारी तातडीने कार्यवाही करीत शेलवडा गाव सील केले आहे. तर आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील ८० कुटुंबातील ५६० जणांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. या पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनिसांचा समावेश आहे.
जालन्यातील महिलेची प्रकृती गंभीर
जालना शहरातील दु:खीनगर भागातील कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पाचवा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
न्युमोनिया, क्षयग्रस्तांची प्रकृती चिंताजनक
जिल्हा शासकीय रूग्णालयात जालना शहरातील न्युमोनियाग्रस्त ५५ वर्षीय महिला, वाटूर (ता.परतूर) येथील न्युमोनियाग्रस्त ३४ वर्षीय पुरूष, परतूर येथील न्युमोनियाग्रस्त ७५ वर्षीय व्यक्ती तर अंबड येथील क्षयरोगग्रस्त ६० वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. संबंधितांची कोरोना तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, संबंधितांची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले.
५३२ अहवाल निगेटिव्ह
जालना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत ८०५ कोरोना संशयित आढळून आले आहेत. कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर ५३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असून, उपचारानंतर ४१५ जणांना रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे.