बोंडअळी प्रादुर्भाव प्रकरणी जालन्यात 'महिको' विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:46 IST2017-12-08T15:43:37+5:302017-12-08T15:46:06+5:30
जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ...

बोंडअळी प्रादुर्भाव प्रकरणी जालन्यात 'महिको' विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक सयप्पा गरंडे यांनी ही तक्रार दिली.
जालना जिल्ह्यात यावर्षी २ लाख ७८ हजार हेक्टरवर कपाशीचे पिक घेण्यात आले होते. यासाठी शेतक-यांनी 'महिको' कंपनीचे बियाणे वापरले होते. मात्र, बोंडअळीने जिल्ह्यातील संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्ह्यातून जवळपास १ लाख शेतक-यांनी जिल्हा गुण नियंत्रक कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. यात बदनापूर तालुक्यातून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
बोलगार्ड तंत्रज्ञान कालबाह्य
याची दखल घेत याबाबत जिल्हा स्तरीय समितीने प्रादुर्भाव झालेल्या भागाची पाहणी केली. पाहणीत बोंडअळीमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले. तसेच 'महिको' कंपनीचे 'बोलगार्ड' हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले असल्याचे निदर्शनास आले. हे तंत्रज्ञान वापरल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष निघाला अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रक सयप्पा गरंडे यांनी सांगितले. महिको कंपनीचे बियाणे वारल्याने हजारो एकरवरील पिकाचे नुकसान झाले. यातून शेतक-यांची फसवणूक झाली असल्याने 'महिको' कंपनी विरुद्ध कापूस बियाणे अधिनयम 2009 व् भादवी 420 व् 427 नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.