रोख, दागिन्यांसह नवरी पसार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:53 IST2018-02-25T00:52:58+5:302018-02-25T00:53:04+5:30
लग्न करून आलेली नवरी दहाव्या दिवशीच अंगावरील सोने, चांदीच्या दागिन्यांसह घरातील रोख रक्कम घेवून पसार झाल्याची घटना परतूर तालुक्यातील संकनपुरी येथे उघडकीस आली.

रोख, दागिन्यांसह नवरी पसार!
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : लग्न करून आलेली नवरी दहाव्या दिवशीच अंगावरील सोने, चांदीच्या दागिन्यांसह घरातील रोख रक्कम घेवून पसार झाल्याची घटना परतूर तालुक्यातील संकनपुरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी सदर मुलीसह तिचा पिता व अन्य एक जणाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
संकनपुरी येथील हॉटेल चालक तरुण रामा बबनराव पानझाडे याने आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ फेब्रुवारी रोजी त्याचा भाऊ चत्रभूज, आई सिंधुबाई व इतर नातेवाईकांसह मुकुंदवाडी औरंगाबाद येथील गजानन शेषेराव जगताप यांच्या किरायाच्या घरात मुलगी पाहण्यासाठी गेले. चहापाण्याच्या कार्यक्रमानंतर मुलगी पसंत असल्याचे तंनी सांगितले. त्यानंतर मुलगी प्रियंका उर्फ कोमल संतोष इंगळे (गायकवाड) हिच्या सोबत रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यासाठी पानझाडे कुटुंबीयांनी ठरल्यानुसार सोन्याचे दागिने खरेदी केली. नववधुला बोरमाळ, नेकलेस, मनी मंगळसूत्र, झुंबर असे दागिने अंगावर घालून रामा व प्रियांका यांचा विवाह लावण्यात आला. विवाहानंतर २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नववधूचे मुलीचे वडील संतोष इंगळे (गायकवाड) हे अन्य एकजण राजू धोत्रे यांच्यासह मुलीला भेटण्यासाठी संकनपुरीला आले.
सर्व पाहुणे जेवण करून झोपी गेले असता २२ फेब्रुवारी रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास रामा यास अचानक जाग आली.परंतु त्याला पत्नी प्रियांका तिचे वडील व सोबत आलेला राजू घरात दिसले नाही. विचारपूस केली असता, तिघेही दागिन्यांसह घरातील कपाटामधील ३० हजार रुपये घेवून मोटार सायकलीवर निघून गेल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकाने त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही त्यांचे मोबाईलही बंद होते.
आपली फसवणूक झाल्याचे पानझाडे कुटुंबीयांच्या लक्षात आले. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात प्रियांका उर्फ कोमल, संतोष इंगळे (गायकवाड) व राजू धोत्रे (रा.मुकुंदवाडी औरंगाबाद) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सपोनी विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार चंद्रकांत पवार हे करीत आहेत. संशयितांनी या पूर्वीही असे प्रकार केले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.