तुमचं लॉन विद्रूप आहे का?- हे घ्या बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 07:47 AM2024-01-20T07:47:05+5:302024-01-20T07:47:40+5:30

ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे नावाच्या महिलेच्या घरासमोरच्या लॉनला जगातील सगळ्यात विद्रूप लॉन असं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

Worlds Ugliest Lawn award won by Tasmanian woman Kathleen Murray | तुमचं लॉन विद्रूप आहे का?- हे घ्या बक्षीस!

तुमचं लॉन विद्रूप आहे का?- हे घ्या बक्षीस!

जगात अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यात अनेक लोक हिरिरीने भागही घेत असतात. खेळाची , अभ्यासातील एखाद्या विषयाची , कलेच्या सादरीकरणाची, शरीरसौष्ठवाची, जोरात गाडी चालवण्याची, पाककला स्पर्धा असते.  या सगळ्या स्पर्धा  सगळ्यात उत्तम जे काही असेल ते शोधण्यासाठी असतात. सगळ्यात चांगलं, दर्जेदार असं जे काही असेल त्याला सामान्यतः बक्षीस दिलं जातं. मात्र, जे काही सर्वोत्तम असेल त्याला बक्षीस या स्पर्धेच्या मूलभूत विचारातच वेगळा विचार करणारेही काही लोक जगात असतात. ते अशाही स्पर्धा भरवतात ज्यात ‘सगळ्यात वाईट असेल त्याला’ पारितोषिक दिलं जातं.

अशीच एक स्पर्धा नुकतीच जगभरात घेतली ती म्हणजे, ‘वर्ल्ड्स अगलीएस्ट लॉन.’ म्हणजेच जगातील सगळ्यात विद्रूप दिसणारं लॉन.   त्या स्पर्धेसाठी अत्यंत घाणेरडी दिसणारी, जराही काळजी न घेतल्यामुळे सुकलेली अनेक लॉन्स परीक्षकांनी बघितली आणि त्यातील सगळ्यात विद्रूप लॉनला बक्षीसदेखील जाहीर केलं. ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे नावाच्या महिलेच्या घरासमोरच्या लॉनला जगातील सगळ्यात विद्रूप लॉन असं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

अशी ही जगावेगळी स्पर्धा घेणारे लोक आहेत तरी कोण? तर  स्वीडन या देशातील गॉटलँड नावाच्या शहराच्या महानगरपालिकेने ही स्पर्धा घेतलेली आहे. खरं म्हणजे स्वीडन हा युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेला अत्यंत सुंदर देश आहे. विकासाच्या सगळ्या निकषांमध्ये जगात कायम पहिल्या दहात जागा मिळवणाऱ्या या देशात भरपूर बर्फवृष्टी होते आणि त्यांच्याकडे  पाण्याची काही कमतरता नाही. शिवाय स्वीडनची लोकवस्तीदेखील अतिशय विरळ आहे. त्यामुळे एकमेकांपासून अंतर राखून बांधलेले सुंदर बंगले आणि अवतीभोवती  देखणी लॉन्स हे स्वीडनमधील कॉमन दृश्य आहे. तरीही गॉटलँड शहराने अशी स्पर्धा का घेतली ? 

तर या शहरात मागे अतिशय तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला. त्याची दाहकता इतकी होती की, सगळ्या शहराला त्याची झळ लागली. त्यावेळी पाणी कपात करण्याच्या विविध मार्गांचा विचार सुरू झाला. त्यात असं लक्षात आलं की, चांगलं लॉन बनवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी खूप पाणी लागतं. पाणीटंचाईच्या काळात लॉनसाठी वापरलं जाणारं पाणी हा पाण्याचा सरळ सरळ अपव्यय ठरतो. त्यावेळी लोकांनी पाणी वाचवावं, यासाठी या महानगरपालिकेने असं जाहीर केलं की, ज्याचं लॉन सगळ्यात घाणेरडं असेल त्याला विशेष बक्षीस देण्यात येईल. कारण, घाणेरडं लॉन म्हणजे निगा न राखलेलं लॉन म्हणजेच त्यासाठी पाण्याचा वापर कमीत कमी केलेला असणार. यात स्पर्धेचा आणि बक्षिसांचा भाग अर्थातच फार किरकोळ होता; पण अशी विचित्र स्पर्धा आयोजित केल्यामुळे खूप लोकांचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि पाणी वाचवण्याचा संदेश खूप लोकांपर्यंत पोहोचला. 

मागच्या वर्षी शहरापुरती मर्यादित असलेली ही स्पर्धा यावर्षी गॉटलँड शहराने  आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केली, कारण पाणी वाचवण्याचा संदेश आज जगात सगळीकडे देणं महत्त्वाचं आहे.  या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवणाऱ्या मुरे या बाई आणि त्यांची चार टीनएजर मुलं त्यांच्या घरात राहतात. त्यांच्याकडे पावसात पडणारं पाणी साचवून ठेवतात आणि  सांभाळून वापरतात. उन्हाळ्यात त्यांच्याकडचं पाणी संपलं तर  पाणी घेऊन येणाऱ्या टँकरची दोन-दोन आठवडे वाट बघावी लागते. त्यामुळे लॉनला नियमित आणि भरपूर पाणी देणं, हे त्यांना मुळातच शक्य नाही. त्यात त्यांच्या जागेत बँडीकूट जातीच्या घुशींचा उपद्रव खूप आहे. गवत लावून ते वाढवण्याच्या प्रयत्न केला जरी, तरी या घुशी जमिनीत बिळं करून  गवत खराब करून टाकतात. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मुरे यांना जगातील सगळ्यात विद्रूप लॉनचा किताब मिळाला. 
- गॉटलँड महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार २०२३ सालच्या स्पर्धेमुळे त्यांच्या बेटावरच्या पाण्याच्या वापरात एकूण पाच टक्क्यांची घट दिसून आली.

कॅथलीन मुरे यांचं बक्षीस
वाईटातलं वाईट लॉन शोधण्याच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या ऑस्ट्रेलिया देशाच्या टास्मानियामध्ये राहणाऱ्या कॅथलीन मुरे यांना बक्षीस म्हणून काय मिळालं? - गोटलँडस अगलीएस्ट लॉन २०२३ या स्पर्धेच्या विजेत्याने दान केलेला सेकंडहँड टी-शर्ट! त्यावर लिहिलं आहे, ‘प्राऊड ओनर ऑफ द वर्ल्ड्स अगलीएस्ट लॉन’.

Web Title: Worlds Ugliest Lawn award won by Tasmanian woman Kathleen Murray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.