भारताचा उत्तर देण्यासाठी आमच्याकडे छोटया पल्ल्याची अणवस्त्रे सज्ज - पाकिस्तान पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:46 IST2017-09-21T18:32:31+5:302017-09-21T18:46:04+5:30
भारतीय लष्कराच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने छोटया पल्ल्याची अणवस्त्रे विकसित केली आहेत.

भारताचा उत्तर देण्यासाठी आमच्याकडे छोटया पल्ल्याची अणवस्त्रे सज्ज - पाकिस्तान पंतप्रधान
वॉशिंग्टन, दि. 21 - भारतीय लष्कराच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने छोटया पल्ल्याची अणवस्त्रे विकसित केली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये बोलताना भारताविरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानने खास अणवस्त्रे बनवल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाबद्दल कोणीही चिंता करण्याचे कारण नाही.
जबाबदार यंत्रणेकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, त्याचा गैरवापर होणार नाही असे अब्बासी यांनी सांगितले. अमेरिकेत थिंक टॅकमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अणवस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानचा अणवस्त्र साठा वेगाने वाढत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जगातील अन्य देशांइतकाच पाकिस्तानचा अणवस्त्र साठा सुरक्षित आहे. पाकिस्तानची अणवस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडणार नाहीत ती पूर्णपणे सुरक्षित आहेत असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान एक जबाबदार देश असून मागच्या 15 वर्षांपासून आम्ही दहशतवादाची लढाई लढत आहोत असे अब्बासी यांनी सांगितले.
'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' म्हणजे काय
2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीनची रणनिती तयार केली. संसदेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला तात्काळ उत्तर देता आले नव्हते. सीमेवर सैन्याची जमवाजमव आणि युद्धाच्या तयारीला भारताला वेळ लागला होता. त्याचवेळी पाकिस्तानने दोनहात करण्याची पूर्ण तयारी करुन ठेवली होती. त्यावेळी 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन'ची रणनिती तयार केली. 2001 साली जी चूक झाली त्यातून घेतलेला हा धडा आहे. या रणनितीनुसार उद्या लढाईचा प्रसंग उदभवल्यास पाकिस्तानला तयारीसाठी अजिबात वेळ न देता तिन्ही सैन्य दले एकत्र येऊन हल्ला करतील.
चीनने केले उल्लंघन
पाकिस्तानला अणूभट्टया देऊन चीनने अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मागच्यावर्षी समोर आले होते. आयएईएने अणवस्त्र प्रसारबंदीच्या प्रगतीचा आढावा घेताना तयार केलेल्या अहवालात चीनबद्दल हे निरीक्षण नोंदवले होते.