ठळक मुद्देचीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते.यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती.

नवी दिल्ली, दि. 14 - डोकलाम संघर्षात भारताबरोबर कोणतीही तडजोड न करता थेट युद्धाचे पाऊल उचलायला हवे होते अशी भूमिका मांडणा-या चिनी विचारवंतांना पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मेजर जनरलने फटकारले आहे. भारता विरोधात मतप्रदर्शन करणा-यांना चीनचे नेमके रणनितीक स्थान काय आहे याची अजिबात कल्पना नाही. चीन आणि भारत दोन्ही देश शेजारी आणि स्पर्धक आहेत. प्रत्येक स्पर्धकाला आपण कठोरपणे वागवू शकत नाही असे मेजर जनरल  कियाओ लियांग यांनी ग्लोबल टाइम्समध्ये लिहीलेल्या लेखात म्हटले आहे. 

चीनचे रणनितीक धोरण आखणीमध्ये कियाओ यांची महत्वाची भूमिका असते. प्रथमच चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिका-याने अशी भूमिका मांडली आहे. यापूर्वी ग्लोबल टाइम्समधून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात होती. भारताला धडा शिकवू, सोडणार नाही असे लेख लिहीले जात होते. डोकलाममध्ये 73 दिवस सुरु असलेला हा संघर्ष मागच्या महिन्यात मिटला. त्यानंतर आता चीनची भूमिका सौम्य होत चालली आहे. 

नाथू ला खिंडीचा रस्ता पुन्हा सुरु करण्यासाठी चीन आता चर्चा करण्यास तयार आहे. हा मार्ग कैलास मानसरोवरला जातो. जिथे दरवर्षी मोठया संख्येने भारतीय भाविक जातात. डोकलाम संघर्ष सुरु झाल्यानंतर हा मार्ग बंद झाला होता. डोकलाम मुद्यावर भारताबरोबर तडजोड करताना चीन सरकारवर दबाव होता. चीनमध्ये अनेकांना हा निर्णय पटला नव्हता. भारताला धडा शिकवायला हवा होता असे अनेकांचे मत होते. डोकलामचा तिढा ज्या पद्धतीने सुटायला हवा होता त्याच प्रकारे या मुद्यावर समाधान निघाले. युद्ध टाळणे गरजेचे होते असे प्रथमच चिनी लष्करातील वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे. 

भविष्यात डोकलामसारखा संघर्ष उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताला रणनितीक मार्गदर्शन करणा-या सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने भारताला लष्करी क्षमता वाढवण्याचा सल्ला दिला आहे.वादग्रस्त सीमा आणि नियंत्रण रेषेवर शांतता रहावी यासाठी भारताने आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले पाहिजे. कारण चीन ताकतीचा आदर करतो असे सेंटर फॉर जाँईट वॉरफेअर स्टडीजने म्हटले आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.