‘या’ गावात वर्षभरात जन्मलं एकच मूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:52 AM2024-01-25T07:52:34+5:302024-01-25T07:52:58+5:30

या गावाला म्हणजेच गावातल्या माणसांना खरं तर तरुणांची आस लागली आहे.

Only one child was born in this village in a year! | ‘या’ गावात वर्षभरात जन्मलं एकच मूल!

‘या’ गावात वर्षभरात जन्मलं एकच मूल!

माणसं म्हातारी झाल्यानंतर त्यांचं जगणं बदलणं स्वाभाविकच आहे. तरुणपणी आयुष्यात असलेली चहलपहल, जबाबदाऱ्यांमधली व्यस्तता आणि धावपळ सगळं शांत होतं. असं फक्त माणसांच्या आयुष्यात घडतं असं नाही, तर माणसांनी गजबजलेल्या गावांच्या बाबतीतही हे होतं. असंच एक गाव म्हातारं झालं आहे. इटलीतल्या या गावाचं नाव आहे ‘सॅन गिओवन्नी लिपिओनी’.

अनेक दशकांपासून नोकरी आणि शिक्षणासाठी म्हणून तरुणांनी गाव सोडायला सुरुवात केली. तेव्हापासून या गावाची फक्त लोकसंख्याच घटली असं नाही तर गावात राहणाऱ्या तरुण लोकांची संख्याही कमी कमी होत गेली. ती इतकी कमी झाली की तरुणांच्या तुलनेत गावात वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. आज सॅन गिओवन्नी लिपिओनी या गावात फक्त १३७ माणसं पूर्णवेळ निवास करत आहेत. या लोकसंख्येत तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे.  

या गावाला म्हणजेच गावातल्या माणसांना खरं तर तरुणांची आस लागली आहे. पण तरुणांनी इथे राहावं, आपलं भविष्य घडवावं असं वातावरण मात्र या शहरात नाही, असं गावातले उरले-सुरले तरुण, प्रौढ म्हणू लागले आहेत. आता त्यांनीही हे गाव सोडून जाण्याचा आपला निर्णय जवळपास पक्का केला आहे. या गावातील लोकांचं सरासरी आयुर्मान हे ६६.१ वर्षे आहे. लोक दीर्घ आयुष्य जगत आहेत. पण शहरातल्या वृद्धांना उत्तमरीत्या सांभाळणं, त्यांची काळजी घेणं जितकं महत्त्वाचं तितकंच तरुणांनाही या गावात आपलं भविष्य दिसणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे याची जाणीव गाव चालवणाऱ्यांना झाली आहे. पण असं असलं तरी दिवसेंदिवस सॅन गिओवन्नी लिपिओनी या गावातल्या घरांवर, दुकानांवर, हाॅटेल रेस्टाॅरण्टवर ‘फाॅर सेल’च्या पाट्यांची संख्या मात्र वाढतच चालली आहे.  

८४ वर्षांचे फ्राॅको मोनॅको यांनीही आपलं घर विकण्यासाठी घराला ‘फाॅर सेल’ची पाटी लावली होती. पण ती पाटी पाहून पाहून तेच इतके वैतागले की ती काढून त्यांनी आपल्या घराच्या  गॅरेजचं रूपांतर एका म्युझियममध्ये केलं. इटलीतील शेतकरी संस्कृतीचं दर्शन घडवणारं ‘म्युझियम ऑफ पिझण्ट कल्चर’ मोनॅको यांनी सुरू केलं. या म्युझियममध्ये शेतीच्या प्राचीन अवजारांसोबतच शहर सोडून जाणाऱ्याचं प्रतीक असलेली ‘फाॅर इमिग्रेण्टस’चं लेबल लावलेली सुटकेस आहे. लोकरी टोप्या, मुसोलिनीचं कॅलेंडर आणि या शहरात जन्मदर घटल्याने इतिहासजमा होण्याची शक्यता असलेला पाळणा देखील आहे.  सॅन गिओवन्नी लिपिओनी या गावातला मृत्युदर जन्मदराच्या तुलनेत कैकपटीने जास्त आहे. या गावात असलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील रजिस्टरमध्ये २०२२ मध्ये फक्त एक मूल जन्माला आल्याची नोंद आहे.  

४३ वर्षांचा गिओवन्नी ग्रोसो आणि त्यांची ३२ वर्षांची पत्नी मेरिसा हे या गावात एक दुकान चालवतात. त्यांनी आपलं दुकान नेटानं चालवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्यांनीही आपल्या दुकानावर ‘फाॅर सेल’ची पाटी लावलीच. गावातल्या तरुणांनी गावातच राहायला हवं, असं इथले लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात दुकानातून साधा पास्ता खरेदी करतानाही सेंटची घासाघीस करतात. हे दुकान चालावं म्हणून मेरिसा गोड पदार्थ, पिझा स्वत: तयार करून विकायला ठेवत होती. पण नर्सिंग होममधल्या वृद्धांच्या वाढदिवसासाठी केकची अधूनमधून येणारी  मागणी वगळता याशिवाय दुसरी कसलीच ऑर्डर नसायची. शेवटी रडकुंडीला येऊन ग्रोसो आणि मेरिसा यांनी आपल्या दुकानावर फाॅर सेलची पाटी लावली.

गावात लहान मुलांची संख्या अगदीच कमी त्यामुळे बालरोगतज्ज्ञही आठवड्यातून एकदाच गावात येतात. फक्त ३ मुलांच्या नोंदणीमुळे गावातली बालवाडीही बंद झाली. अशा परिस्थितीत ना आपलं भविष्य ना आपल्या मुलांचं भविष्य त्यामुळे ग्रोसो आणि मेरिसा आता आपल्या मुलांसोबत हे गाव सोडून बोलोगा या इटलीतल्या जास्त लोकसंख्या आणि भविष्य घडविण्याची संधी असलेल्या शहरात स्थलांतरित होणार आहेत. ‘तुम्ही इथे थांबता, प्रयत्न करता, गुंतवणूक करता पण शेवटी सगळं गमावण्याची वेळ येते. आमच्यावर ती आली. खरं तर अख्या गावावरच ती आली आहे. मग गाव सोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरतो का,’ असा प्रश्न विचारताना मेरिसाचा कंठ दाटून येतो.

तरुण मुला-मुलींनो, आमच्याकडे या!
तरुणांना आकर्षित करण्यासाठी गावातील स्थानिक संघटनेने  बंद असलेल्या घरांमध्येच संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शांत गाव, मोकळी घरं मोठ्या प्रमाणात  उपलब्ध आहेत, अशी जाहिरात केली जात आहे. तरुण माणसं हवी आहेत यासाठी गावात फुटबाॅल ग्राउण्ड तयार करणे, रस्ते सुधारणे ही कामं करायला गावाचे मेयर निकोला रोस्सी यांनी सुरुवात केली आहे. प्रश्न इतकाच, या प्रयत्नांनी हे गाव पुन्हा तरुण होणार आहे की नाही?

Web Title: Only one child was born in this village in a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.