जॉनी मेरा नाम..!
By Admin | Published: July 15, 2017 12:29 AM2017-07-15T00:29:19+5:302017-07-15T00:29:19+5:30
जगभ्रमंती करण्याचे स्वप्न तर अनेक जण पाहतात, पण प्रत्येकाला ते शक्य असतेच असे नाही.
जगभ्रमंती करण्याचे स्वप्न तर अनेक जण पाहतात, पण प्रत्येकाला ते शक्य असतेच असे नाही. शेवटी प्रश्न पैशांचा येतो. जॉनी वार्डच्या बाबतीतही असेच झाले. लहानपणापासून आईनेच सांभाळ केलेला. मध्यमवर्गीय कुटुंब. जगभ्रमंती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने एका मुलांच्या संस्थेत काउंसलरची नोकरी पत्करली. याच वेळी एक थायलँड टूर आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी इंग्रजी शिकविण्याची जबाबदारी जॉनीवर सोपविण्यात आली. त्याच्यासाठी ही मोठी संधी होती. याच काळात त्याने एका मेडिकल रिसर्चमध्ये भाग घेतला. यातून त्याला तीन हजार डॉलरची कमाई झाली. जगभ्रमंती करण्यासाठी ही कमाई पुरेशी होती. त्यानंतर, त्याने ही नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ जगभ्रमंतीसाठी द्यायचे ठरविले. या घटनेला आता दहा वर्षे झाली आहेत. एव्हाना जॉनी १९७ देश फिरून आला आहे. या भ्रमंतीत जॉनी याच्या मनात विचार आला की, एखादा ट्रॅव्हल्स ब्लॉग तयार करावा. त्याने वनस्टेप फोरवर्ड नावाचा एक ब्लॉगही तयार केला. एके काळी नोकरी करणारा जॉनी आता कोट्यवधींचा मालक झाला आहे. एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाला संधी निश्चित मिळते. फक्त ती वेळ तुम्हाला समजली पाहिजे. जॉनीने या संधीचे सोने केले.