इजिप्तमध्ये कार बॉम्बच्या आत्मघातकी स्फोटात 10 जण ठार
By admin | Published: July 7, 2017 04:15 PM2017-07-07T16:15:53+5:302017-07-07T16:54:55+5:30
इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे.
ऑनलाइन लोकमत
काहिरा, दि. 7 - इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे. सिनाई प्रांतातील सेनेच्या एका चेकपोस्टवर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात कर्नलसह 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रफाह आणि शेख जुवैद यादरम्यान असलेल्या एका चेकपोस्टवर दोन कारमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे.
या कार बॉम्बस्फोटात 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. उत्तर सिनाई हा दहशतवादी संघटन असलेल्या इसिसचा बालेकिल्ला समजला जातो. 2013पासून आतापर्यंत या भागात पोलीस आणि सेनेचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. मात्र या आत्मघातकी बॉम्बस्फोटानं इजिप्त पुन्हा एकदा हादरलं आहे.
गेल्या दिवसांपूर्वी मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले होते. कॉप्टिक ईसाइ (ख्रिस्ती) ला घेऊन जाणाऱ्या एका बसवर गोळीबार झाला होता. यामध्ये मृत झालेल्यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले होते. ईसाइ (ख्रिस्ती) समाजावर झालेला हा या दोन महिन्यांतील दुसरा मोठा हल्ला होता.