ठळक मुद्देउत्तर कोरियातूननिर्यात चीनला  80 टक्के कापड निर्यात होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बेकायदा, नियमबाहय ठरावाचा मी निषेध करतो.

वॉशिंग्टन, दि. 13 - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध धुडकावून लावत उत्तर कोरियाने उलटी अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यामुळे सुरक्षा परिषदेने एकमताने उत्तर कोरियावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. 

संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या कापड निर्यातीवर बंदी आणली असून, तेल आयात करण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. यूएनच्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेला थोडी झळ बसेल. कापड उद्योगात चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. उत्तर कोरियातूननिर्यात चीनला  80 टक्के कापड निर्यात होते. अमेरिकेतीलही काही कापड उद्योजक उत्तर कोरियावर अवलंबून आहेत. 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या बेकायदा, नियमबाहय ठरावाचा मी निषेध करतो असे उत्तर कोरियाच्या राजदूत हान टाई यांनी जिनेव्हामधील परिषदेत बोलताना सांगितले. अमेरिकेमुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होतेय असा आरोप हान यांनी केला आहे. अमेरिकेने इतिहासातील सर्वात मोठी वेदना सहन करण्यासाठी तयार राहावे अशी धमकीच उत्तर कोरियाच्या राजदूताने दिली आहे. सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर जगभरातून उत्तर कोरियाचा निषेध करण्यात येत आहे. 
 

हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय?
हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.