आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:07 PM2024-02-29T16:07:05+5:302024-02-29T16:08:44+5:30

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या (TIFR) डॉक्टर आणि संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे आणि ती कॅन्सरवर मात केलेल्यांना पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकते...

Cancer will not happen a second time tata institute discovered the cure for cancer medicine will be available for only rs 100 | आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये!

आता दुसऱ्यांदा होणार नाही कॅन्सर? डॉक्टरांनी शोधून काढला इलाज; किंमत असेल केवळ 100 रुपये!

जगभरात कँन्सर ग्रस्तांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तरी जगण्याची शाश्वती देता येत नाही. मात्र, नुकतेच डॉक्टर आणि संशोधकांनी कॅन्सरवरील इलाजासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या डॉक्टर आणि संशोधकांनी दावा केला आहे की, त्यांनी एक टॅब्लेट विकसित केली आहे आणि ती कॅन्सरवर मात केलेल्यांना पुन्हा कॅन्सर होण्यापासून वाचवू शकते.

10 वर्षांपर्यंत चालले संशोधन -
इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि संशोधकांनी म्हटले आहे की, दहा वर्षांपर्यंत विविध प्रकारचे संशोधन करून अखेर आम्ही ही टॅबलेट तयार केली. टीआयएफआरच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ही टॅबलेट केवळ दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासूनच वाचवू शकत नाही, तर  रेडिएशन आणि किमोथेरेपीमुळे होणारे दुष्परिणामही कमी करेल. वरिष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांनी या टॅब्लेटसंदर्भात बोलताना म्हटले आहे की, "अनेक संशोधकांनी आणि डॉक्टरांनी दहा वर्षांपर्यंत कठोर परिश्रम घेत ही टॅब्लेट शोधून काढली आहे. तज्ज्ञांनी संशोधनासाठी मानवी कॅन्सरच्या पेशी उंदरांमध्ये टाकल्या. यानंतर उंदरांवर केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. यात संशोधकांना आढळून आले की, काही काळानंतर कॅन्सर पेशी मरण पावल्या आणि त्यांचे लहान लहान तुकडे झाले. याला 'क्रोमॅटिन कण', असे म्हटले जाते."

दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून वाचवेल ही टॅब्लेट -
पुढे बोलताना बडवे यांनी सांगितले की, "संशोधकांनी उंदरांना दुसऱ्यांदा कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी रेझवेराट्रोल आणि कॉपर (R+Cu) युक्त प्रो-ऑक्सिडंट गोळ्या दिल्या. या संशोधनात असे दिसून आले आहे की, कॉपर (R+Cu) ऑक्सिजन रॅडिकल्स तयार करते आणि क्रोमॅटिन पेशी नष्ट करते."

"संशोधकांनी विकसित केलेली ही टॅब्लेट कॅन्सरच्या उपचारांचे दुष्परिणाम 50 टक्क्यांनी कमी करते आणि दुसऱ्यांदा कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी 30 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. मात्र, ही टॅबलेट बाजारात आणण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल," असेही बडवे यांनी म्हटले आहे.

कधीपर्यंत बाजारात येणार ही टॅबलेट - 
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे म्हटल्याप्रमाणे, ही टॅब्लेट जून-जुलैमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. ही टॅब्लेट अनेक कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरेल. हा टॅबलेट केवळ 100 रुपयांना उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीच्या संशोधकांचे म्हणणे आहे. ही टॅबलेट बाजारात आल्यास, हे टाटा इंस्टीट्यूटचे मोठे यश ठरेल.

Web Title: Cancer will not happen a second time tata institute discovered the cure for cancer medicine will be available for only rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.