कर्करुग्णांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 01:35 AM2019-02-04T01:35:57+5:302019-02-04T01:36:10+5:30

कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणे जसे अत्यावश्यक आहे, तसेच कर्करुग्णांमध्ये व त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असते.

Cancer editorial Artical | कर्करुग्णांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक

कर्करुग्णांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक

Next

- डॉ. राकेश नेवे

कर्करोगाचा प्रतिबंध, योग्य वेळी निदान व उपचार या तीन सूत्रांवर सामाजिक जागरूकता करणे जसे अत्यावश्यक आहे, तसेच कर्करुग्णांमध्ये व त्यांच्या आप्तस्वकीयांमध्ये आशावादी व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असते. मी या संकटातून हळूहळू का होईना निश्चितच बाहेर येईन, हा विश्वास रुजवणेदेखील खूप गरजेचे असते. कर्करुग्णांचे प्रमाण कमी करणे व कर्करोगामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे हा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर समाजात जगभर जागरूकता निर्माण होण्यासाठी यावर्षीपासूनची पुढील तीन वर्षांसाठी (२०१९ ते २०२१) ची जागतिक घोषणा आय अ‍ॅम; आय विल अशी असणार आहे. याचा अर्थ असा, की जगाच्या पाठीवर कोणताही व कोठेही कॅन्सर झालेला रुग्ण असो; त्याने / तिने स्वत:ची स्वत:शी असलेली बांधिलकी जपत; भविष्यकाळ चांगला निरोगी होण्यासाठी स्वत:चे सर्व पातळ््यांवर सशक्तीकरण करण्याचा निर्धार करावयाचा आहे. या संकटातून बाहेर येण्याचा विश्वास जपत, आत्मविश्वास उत्तम ठेवून योग्य ती पावले उचलायची आहेत.
प्रत्येक कर्करुग्ण हा त्याच्या कथेचा नायक असतो. त्यामुळे जागतिक कर्करोग संघटनेला या घोषणेद्वारे सर्वदूर पसरून प्रत्येक रुग्णाला रोगमुक्त होण्याचा विश्वास व योग्य प्रेरणा द्यावयाची आहे.
भारतामध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अहवालानुसार मागील पंचवीस वर्षांमध्ये हे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर); गर्भपिशवीचा कर्करोग (सर्विक्स); मुखकर्करोग (तोंडाचा) व फुफ्फुसाचा कॅन्सर हे सामान्यत: जास्त प्रमाणात आढळतात. याची टक्केवारी ४०% पेक्षा अधिक आहे. यामध्ये प्रमुख कारण हे अयोग्य जीवनशैली हे आहे. जास्तीत जास्त आढळणारा स्तनाचा कॅन्सर हादेखील बऱ्याचदा तरुण वयात चुकीच्या जीवनशैलीमुळे सुरू होतो आणि बºयाचदा उशिरा लक्षात येतो. संशोधनानुसार स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सध्या अंदाजे १ लाखास २६ इतके आहे. एक लाख महिलांमध्ये पंचवीसपेक्षा जास्त महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो व २०२६ पर्यंत हे प्रमाण लाखास ३५ इतके वाढण्याची भीती आहे.
ही आकडेवारी पाहता जीवनशैली सुधारून कॅन्सर होऊच नये, म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आंग्लदेशातील नवीन संशोधनानुसार वार्षिक बेचाळीस टक्के कर्करुग्णांमधे जीवनशैलीशी निगडित कारणे आढळली व त्यात सुधारणा करून दरवर्षी ३४०० रुग्णांना कॅन्सर होण्यापासून रोखता येणे शक्य आहे, असा निष्कर्ष निघाला.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकात नुकतेच याविषयी संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अकरा वर्षे १.४४ दशलक्ष व्यक्तींचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. सातत्याने नियमित व्यायाम करणाºया व्यक्तींना कर्करोग होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष यातून निघाला. व्यायामामध्ये ‘धावण्याचा’ व्यायामप्रकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘धावणे’ हा अगदी कोणालाही जमण्यासारखा व्यायामप्रकार आहे; मात्र याचेही नियमपालन करणे जरुरीचे आहे. कोणताही व्यायाम सुरू करताना वॉर्म अप आवश्यक असतो. धावण्यापूर्वीदेखील पाच ते सात मिनिटे ‘वॉर्म अप’ करावा. भरभर चालण्यापासून सुरुवात करावी व हळूहळू पळण्याचा वेग वाढवावा. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार ध्येय ठरवावे. धावताना शरीराची योग्य स्थिती राखावी व शूज योग्य वापरावेत. सकाळी धावण्यापूर्वी रात्रीची झोप पुरेशी झालेली असली पाहिजे. धावताना शक्यतो हवे त्या दिशेने धावावे. डीहायड्रेशन होऊ देऊ नये. धावण्याचा व्यायाम करणाºया व्यक्तींच्या आहारात पुरेसे प्रोटिन्स, कर्बोदके व सर्व जीवनसत्त्वे यांचा समावेश असणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणाºया महिलांमध्ये एंडोमेट्रियम (गर्भपिशवीच्या अंतस्तराचा) कॅन्सर होण्याची शक्यता २१ टक्क्यांनी व स्तनकर्करोगाची शक्यता १० टक्क्यांनी कमी होते, असे संशोधकांचे मत आहे. उत्तम जीवनशैली, नियमित व्यायाम यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्याची शक्यतादेखील काही अंशी कमी होते.
व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते, हार्मोन्स संतुलित राहतात, प्रतिकारशक्ती उत्तम राहते व काही प्रकारचे कर्करोग आपण निश्चितच टाळू शकतो अथवा नियंत्रणात ठेवू शकतो. मात्र याव्यतिरिक्त मोकळा वेळ असतानादेखील हालचाली करीत राहिले पाहिजे. थोडाही निवांतपणा मिळाला, की लोळण्याची सवय जर असेल तर ती घातक आहे.
सततच्या शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन व इस्ट्रोजेन हॉर्मोन्स योग्य राहतात व त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
(लेखक कॅन्सर सर्जन आहेत.)

केमोथेरपी, रेडिओथेरपी व कॅन्सरचे आॅपरेशन या उपचारांमुळे शरीर दुर्बल झालेले असते व अतिशय थकवा आलेला असतो. हा कॅन्सर रिलेटेड फटिंग हलक्या व्यायामाने कमी होऊ शकतो व रुग्णाचा उत्साह वाढतो. आत्मविश्वास वाढतो व यातून मन आनंदी राहू शकते. या यथाशक्ती केलेल्या व्यायामामुळे उदा. : ‘ब्रिस्क’ वॉकिंगमुळे उमेद व शरीरबल मिळते. या फायद्यांबरोबरच रुग्णाचा होणारा स्नायूंचा ºहास थांबवणे, वजन योग्य ठेवणे व अन्य संस्थांचे आरोग्य उत्तम ठेवून रुग्णास लवकर बरे होण्यास फायदा होतो.

या सर्वांव्यतिरिक्त जो महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे व्यायामामुळे रुग्णाचा कमी झालेला आत्मविश्वास परत आणण्यास मदत होते. परिस्थिती निराशाजनक असताना, एक एक गोष्ट निसटून जातेय की काय, असे वाटत असताना या संयमित योग्य व्यायामामुळे रुग्णाला सकारात्मकतेकडे जाण्यास मदत होते, आशावाद वाढतो व उत्साह वाढतो. ही मानसिक ताकद वाढणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.

लिजर टाइममध्ये उत्साहाने केलेल्या जास्तीत जास्त शारीरिक हालचालींमुळे यापूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेले तीन (मोठ्या आतड्याचा कर्करोग, स्तनाचा = ब्रेस्ट कॅन्सर, अंतस्तराचा = एंडोमेट्रियम कॅन्सर) प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होतेच; पण इतर काही कॅन्सर. उदा. अन्ननलिकेचा, यकृताचा, जठराचा, वृक्कचा (किडनी), मायलॉइड ल्युकेमिया, हेडनेकचे कॅन्सर, मयलोमा, आतड्याचा, ब्लाडर व फुफ्फुसाच्या अशा १३ प्रकारच्या कर्करोगांना बळी पडण्याची शक्यता कमी होते. हा निष्कर्ष नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी काढला आहे व तो मे २०१६ च्या जर्नल आॅफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन (खअटअ) नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे.

रोज अगदी मॅरेथॉनच धावली पाहिजे असे नव्हे, तर अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या सल्ल्यानुसार एका प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून पाच दिवस एकूण १५० मिनिटांचा मध्यम स्वरुपाचा व्यायाम अथवा ७५ मिनिटांचा तीव्र स्वरुपाचा व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

कर्करोगाचे उपचार सुरू असणाºया रुग्णांना व्यायामाचा उपयोग आहे का?
निश्चितच हो.
व्यायामाचे फायदे सर्वश्रुत आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम करण्याºया रुग्णांचे आयुर्मान निश्चितच वाढते. त्यांचा उत्साहदेखील वाढतो. त्यामुळे डॉक्टर जसे रोग प्रतिबंधात्मक म्हणून व्यायाम सांगतात, तसेच शरीरबलानुसार कर्करुग्णांनादेखील सांगतात.

कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?
उत्तम जीवनशैली, समतोल ताजा व योग्य आहार
नियमित व्यायाम करावा
तंबाखू, धूम्रपान आदी व्यसनांपासून दूर राहावे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वयाच्या पन्नाशीनंतर नियमित मॅमोग्राफी करावी
लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये
प्याप स्मियर, सर्विकल सायटोलॉजी आदी तपासण्या कराव्यात
सर्वत्र उपलब्ध असलेले एचपीवी वाक्सिनचे लसीकरण मुलींनी व महिलांनी करून घ्यावे.


 

Web Title: Cancer editorial Artical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.