काल पुरस्कार, आज नमस्कार, ट्रॅफीक सेंटीनलला संतप्त ग्रामस्थांचा गराडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 20:56 IST2018-02-10T20:55:58+5:302018-02-10T20:56:08+5:30
पोलिस खात्याने वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना चपराक बसावी म्हणून ट्रॅफीक सेंटीनल नेमण्याची व्यवस्था नागरिकांमार्फत केली व यशस्वी ट्राफीक सेंटीनलना खात्यातर्फे हजारोंची बक्षिसे मिळू लागली.

काल पुरस्कार, आज नमस्कार, ट्रॅफीक सेंटीनलला संतप्त ग्रामस्थांचा गराडा
पणजी - पोलिस खात्याने वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना चपराक बसावी म्हणून ट्रॅफीक सेंटीनल नेमण्याची व्यवस्था नागरिकांमार्फत केली व यशस्वी ट्राफीक सेंटीनलना खात्यातर्फे हजारोंची बक्षिसे मिळू लागली तरी, काही भागात अतिउत्साही सेंटीनल हे वादाचा विषय ठरण्यास आरंभ झाला आहे. आदित्य कटारिया या सेंटीनलने आपल्या कॅमे-यात वाहतूक नियमभंगाचे सर्वाधिक गुन्हे नोंदविल्यामुळे त्याला पोलिस खात्याने शुक्रवारी 69 हजार रुपयांचा पुरस्कार दिला पण शनिवारी सांताक्रुझ भागात कटारिया यांच्यावर बाका प्रसंग ओढवला. संतप्त नागरिकांच्या तावडीतून वाचण्यासाठी लोकांसमोर त्यास हात जोडून स्वत:ची सुटका करून घ्यावी लागली.
लोक आपल्या घरातून बाहेर पडताना हेल्मेट घालत नाहीत. जर कुणी आपल्याच वाडयावरील एखाद्याच्या घरी जात असेल किंवा दुकानावर, बेकरीत, जवळच मासळी खरेदीसाठी वगैरे जात असेल तर सहज दुचाकी घेऊन जातात. मात्र भर लोकवस्तीत व भर रस्त्यावर उभे राहून नेमक्या अशा दुचाकीस्वारांना मोबाईलच्या कॅमे-यात टिपण्याचा उत्साह ट्रॅफीक सेंटीनल कटारिया याने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दाखवला. प्रत्येकाचेच फोटो टिपले जात आहेत असे दिसून येताच त्या परिसरातील सगळे नागरिक एकत्र आले.
दुचाकीस्वारही थांबले व कटारिया यास घेराव घातला. नागरिक संतप्त झाले होते. प्रकरण हातघाईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली.
तू आतिल मार्गावर का राहिला आहेस, आम्ही रोजची आमची कामे करण्यासाठी या रस्त्यावरून दुचाकीवरून फिरत असतो, तू महामार्गावर उभा राहून तेथील वाहतूक नियमभंगाचे फोटो काढ असे सल्ले नागरिकांनी कटारिया याला दिले. शेवटी कटारिया याने अक्षरश: हात जोडले. आपण पुन्हा असे करत नाही असे सांगत त्याने नागरिकांपासून स्वत:ची सुटका करून घेतली. कटारिया यास नावाने कुणी ओळखत नव्हते. काही नागरिकांनी मध्यस्थी करत कटारिया यास जाऊ द्यावे असा सल्ला दिला. मात्र दुस:यावेळी अशा छोटया वाडयांवर आणि भर वस्तीतील अंतर्गत रस्त्यांमध्ये दुचाकीस्वार आणि अन्य वाहनधारकांचे फोटो काढू नका असे सल्लेही कटारिया यास दिले गेले.
दरम्यान, वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनांचा फोटो काढून तो वॉट्स अॅपद्वारे पोलिसांना पाठविणा-या ट्रॅफीक सेंटीनलना हजारो रुपयांची बक्षिसे देणो पोलिस खात्याने सुरू केल्यानंतर हजारो छायाचित्रे पोलिसांना मिळू लागली आहेत व सेंटीनलना नियमितपणो हजारो रुपयांचे पुरस्कारही प्राप्त होऊ लागले आहेत.