गोव्यात तिस-या दिवशीही टुरिस्ट टॅक्सी बंद, स्थानिकांचीही परवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 01:04 PM2018-01-21T13:04:52+5:302018-01-21T13:05:04+5:30

या संपाची केवळ पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिकांनाही झळ पोचलेली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून (गोमेकॉ) रुग्णांना डिसचार्ज दिल्यानंतर घरी परतताना त्रास होत आहे

Tourist Taxi stopped in Goa for the third day | गोव्यात तिस-या दिवशीही टुरिस्ट टॅक्सी बंद, स्थानिकांचीही परवड

गोव्यात तिस-या दिवशीही टुरिस्ट टॅक्सी बंद, स्थानिकांचीही परवड

googlenewsNext

पणजी : टुरिस्ट टॅक्सीमालकांनी स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत रविवारी सलग तिस-या दिवशीही संप चालूच ठेवून टॅक्सीसेवा बंद ठेवली. टॅक्सीमालकांच्या प्रश्नावर काँग्रेसचे काही नेते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची काही तासातच भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काँग्रेसी नेते आंदोलकांना येथील आझाद मैदानात संबोधणार आहेत. सकाळी ९.३0 वाजल्यापासून टॅक्सीवाले पुन: आझाद मैदानात जमले. सुमारे दोन हजारांचा जमाव येथे असून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पर्यटकांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. 

रुग्णांचीही मोठी परवड 

या संपाची केवळ पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिकांनाही झळ पोचलेली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून (गोमेकॉ) रुग्णांना डिसचार्ज दिल्यानंतर घरी परतताना त्रास होत आहे. टॅक्सी नसल्याने रुग्णांची परवड होते. नातेवाईकांना धावपळ करुन खाजगी वाहनांची व्यवस्था करावी लागते. बाहेरुन टॅक्सी आणल्यास गोमेकॉच्या आवारातील टॅक्सीवाले त्याला घेराव घालून जाब विचारतात. त्यामुळे बाहेरील टॅक्सीही गोमेकॉत येण्याचे टाळत आहेत. 

सलग तीन दिवस टॅक्सी संप चालू राहिला यावरुन सरकारनेही कडक पवित्रा स्वीकारल्याचे स्पष्ट होते. स्पीड गव्हर्नरच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि यात कोणताही हस्तक्षेप करणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हा बंद मोडून काढण्यासाठी ‘ओला’, ‘उबेर’ यासारख्या व्यावसायिक टॅक्सी सेवा गोव्यात आणण्याबाबतही सरकार गंभीरपणे विचार करीत आहे.  

दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर कदंब महामंडळाने दाबोळी विमानतळ, रेल्वे स्थानके आदी ठिकाणहून बससेवा सुरु केली असली तरी या बसेस अपु-या पडत आहेत. दाबोळी विमानतळावर गर्दीचे स्वरुप आलेले आहे. गेले तीन दिवस एखाद्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकाप्रमाणे हा विमानतळ दिसत आहे. शनिवारी प्रिपेड टॅक्सीलवाल्यांनी सेवा देण्यास नकार दिला तेव्हा गोंधळ उडाला. 

अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

Web Title: Tourist Taxi stopped in Goa for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा