तब्बल ६२ महिला सेल्फ ग्रुप एका बॅनरखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 07:46 PM2019-03-15T19:46:40+5:302019-03-15T20:06:55+5:30

गोव्यातील हरमल या छोट्या गावात प्राप्ती महिला फेडरेशनच्या बॅनरखाली तब्बल ६२ महिला सेल्फ हेल्प ग्रुपचे कार्य चालू आहे. नारायण रेडकर यांनी या सर्व महिला सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आणण्याचे काम केले आहे.

A total of 62 women's self groups under a banner | तब्बल ६२ महिला सेल्फ ग्रुप एका बॅनरखाली

तब्बल ६२ महिला सेल्फ ग्रुप एका बॅनरखाली

Next

पणजी : गोव्यातील हरमल या छोट्या गावात प्राप्ती महिला फेडरेशनच्या बॅनरखाली तब्बल ६२ महिला सेल्फ हेल्प ग्रुपचे कार्य चालू आहे. नारायण रेडकर यांनी या सर्व महिला सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आणण्याचे काम केले आहे. दहा वर्षांपूर्वी २००८ साली आपली दिवंगत पत्नी प्राप्ती हिच्या स्मरणार्थ रेडकर यांनी या फेडरेशनची स्थापना केली आणि त्याअंतर्गत आज केरी, हरमल, कोरगाव, पालयें या भागात मिळून सुमारे ६२ महिला सेल्फ हेल्प ग्रुप ते चालवत आहेत. या ग्रुपची सरकार दरबारी नोंदणी करण्यापासून त्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देणे. आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे. दर पाच वर्षांनी चार्टर्ड अकाउंटंटकडे हिशोबाचे ऑडिट करून नूतनीकरण करून देणे आदी सर्व गोष्टी रेडकर स्वखर्चाने करत असतात. अतिशय गरीब परिस्थितीत एका सामान्य कुटुंबातून आलेले रेडकर हे पदरमोड करून हे कार्य चालवत आहेत.

सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडाविषयक असे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत. महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ मार्च रोजी हरमल येथे सार्वजनिक गणेशोत्सव हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले असून प्रख्यात गायिका हेमा सरदेसाई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रेडकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, 'महिलांना आर्थिकदृष्टया सबल करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढा देणे, या हेतूने फेडरेशन स्थापन केले आहे. दरवर्षी महिलादिनाचे कार्यक्रम तर आम्ही करतोच, शिवाय हळदीकुंकू तसेच अन्य कार्यक्रमही होतात.

महिलांना नृत्य, नाट्य आदी क्षेत्रातही व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न असतो. ते म्हणाले की, कुटुंबामध्ये महिला प्रमुख घटक असतात. परंतु अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे त्या दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी डॉक्टर आणून आरोग्य शिबिरेही आम्ही आयोजित करतो. हरमल परिसरात रक्तदान शिबिर, कचरा साफसफाई आदी उपक्रम केले जातात. एखाद्या सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यास जाब विचारण्यासाठी या महिला जातात. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा झाल्यास बांधकाम अधिकार्‍यांवरही अनेकदा मोर्चे नेले आहेत. 

सरकार दरबारी आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केले, या प्रश्नावर रेडकर म्हणाले की, १५ सेल्फ हेल्प ग्रुपना अलीकडेच प्रत्येकी ३० हजार रुपयांचा निधी सरकार दरबारी पाठपुरावा करून मिळवून दिलेला आहे. टेलरिंग, ज्वेलरी मेकिंग, फ्लॉवर मेकिंग, कुकिंग आदी प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी हा निधी वापरता येईल. याशिवाय आधी समाजकल्याण खात्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपये निधी मिळवून दिला. महिलांसाठी स्वतः प्रशिक्षण क्लासेस सुरू केलेले आहेत.

केवळ मांद्रे मतदारसंघातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही वारखंड, मोपा, पेडणे आदी ठिकाणी महिला सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन करून देण्याचे काम मी केले आहे. प्राप्ति स्पोर्टस, कल्चरल क्लबच्या माध्यमातून हरमल  व परिसरात संगीत नाट्य महोत्सव, दशावतार नाट्य महोत्सव, क्रिकेट स्पर्धा तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही केले आहेत. हिंदू आणि ख्रिश्चन तसेच अन्य धर्मीय महिलाही ग्रुपमध्ये आहेत. याशिवाय मच्छीमारांसाठी लक्ष्मीनारायण फिशरमेन्स सोसायटी स्थापन केली आहे. त्याअंतर्गत मच्छीमारांच्या समस्या सरकार दरबारी नेण्याचे काम करतो. हरमलमध्ये शॅकमुळे पारंपरिक रापणकाराना मासेमारीसाठी त्रास होतो. त्यांच्यासाठी जागा ठरवून द्यावी, त्यासाठी मुख्य सचिव, पर्यटन खाते, मच्छीमार खाते, सीआरझेड आदी ठिकाणी आठ वर्षे पाठपुरावा करीत आहे. परंतु काहीही झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: A total of 62 women's self groups under a banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा