Opposition to doctors in Goa, against the Center's Medical Commission bill | केंद्राच्या वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात, गोव्यात डॉक्टरची निदर्शने

पणजीः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात राज्यातील सर्व डॉक्टरांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या बॅनरखाली राज्यभर निदर्शने केली. गोमेकॉ व इतर इस्पितळांतील डॉक्टरांनी या विधेयकाचा प्रतीकात्मक निषेध करताना निदर्शने केली. या निर्णयाच्या निषेधार्थ काळा दिवस पाळण्यात आला.

या निदर्शनात सरकारी तसेच खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी भाग घेतला. खासगी इस्पितळातील डॉक्टर बाह्यरुग्ण विभाग बंद ठेऊन निदर्शनांसाठी उतरले तर सरकार डॉक्टर हे प्रतीकात्मकरीत्या या निदर्शनात सहभागी झाले. केंद्र सरकार इंडियन मेडिकल कौन्सिल बरखास्त करून त्या जागी भारतीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यासाठी कायदा बनविण्याच्या तयारीत आहे. या आयोगात डॉक्टरांना अत्यल्प प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्यामुळे देशभरातील डॉक्टर मंडळींचा त्याला विरोध आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल रद्द करू नये आणि आयोगाची स्थापना करू नये अशी त्यांची मागणी आहे. 

तूर्त हे विधेयक मागे घेण्यात यावे अशी मागणी करून देशभर मंगळवारी निदर्शने करण्यात आली त्यात गोव्यातील डॉक्टर्सनीही भाग घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे 60 हून अधिक सदस्य सकाळी आझाद मैदानात जमले आणि त्यांनी या विधेयकाच्या विरोधात निदर्शने केली. आझाद मैदानातून जुने वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीपर्यंत चालत जाऊन ही निदर्शने केली. असोसिएशनच्या मडगाव शाखेकडून मडगावात निदर्शने करण्यात आलीअसोसिएशनचे अध्यक्ष डॉ अजय पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली आणि या विधेयकाबाबत गोमंतकीय डॉक्टरांची भावना केंद्राला कळविण्याची मागणी केली.


Web Title: Opposition to doctors in Goa, against the Center's Medical Commission bill
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.