पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:34 PM2019-05-10T13:34:20+5:302019-05-10T13:36:15+5:30

उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप; आयोगाकडेही तक्रारी 

one week left for panaji assembly by election candidates gears up campaign | पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

Next

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असून या पोटनिवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. घरोघरी गाठीभेटींसाठी उमेदवारांची धावपळ चालली आहे. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप, एकमेकांविरुध्द तक्रारीही केल्या जात आहेत. 

येत्या १९ रोजी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रचारासाठी जवळपास आठवड्याभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांची धावपळ उडाली आहे. भाजपा उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर सायंकाळी उशिरापर्यत प्रचारकार्यात दिसत आहेत. तर सकाळी ९ नंतर प्रचारकामाला सुरुवात करणारे काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात आता दोन तास आधीच बाहेर पडू लागले आहेत. ‘गोसुमं’चे सुभाष वेलिंगकर, ‘आप’चे वाल्मिकी नायक यांनीही प्रचाराची गती वाढवली आहे.

पर्रीकरांची पुण्याई कामी येणार? 
भाजपाने पर्रीकर यांच्या जागी माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना रिंगणात उतरवले आहे. पर्रीकर यांच्या पश्चात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संपूर्ण गोव्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. पर्रीकरांची पुण्याई भाजपच्या कामी येते की यावेळी काँग्रेस बाजी मारतो, हे पहावे लागेल. 
काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी स्वत:च्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे टाळल्याप्रकरणी भाजपने गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे बंधनकारक असून या प्रकरणात अवमान याचिका सादर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांना सादर केलेल्या या तक्रारीत असे म्हटले आहे की, मोन्सेरात व काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या सक्तीच्या तरतुदीचा भंग केलेला आहे आणि तो कोर्टाचाही अवमान ठरतो. आयोगाने उमेदवाराला याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तेंडुलकर यांनी हेही निदर्शनास आणले आहे की, बाबुश यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुध्द भादंसंच्या विविध कलमांखाली तसेच, ‘पोस्को’, आयकर कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे.

दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले की, ‘कुणाल यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेले असून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले जातील, असे आश्वासन दिलेले आहे.’ दरम्यान, भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी या प्रकरणात प्रसंगी अवमान याचिकाही सादर करु, असा इशारा दिला आहे.

दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सिध्दनाथ बुयांव यांनी भाजपचे माजी आमदार दामू नाईक यांनी बाबुश यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचा समाचार घेताना पर्रीकर पणजीत निवडणूक लढवायचे, तेव्हा भाजपा बाबुशचा पाठिंबा कोणत्या तोंडाने घ्यायची? असा सवाल केला आहे. येत्या २३ नंतर राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल त्यानंतर दामू नाईक यांच्यावर खटले भरु, असा इशारा दिला आहे. 
 

Web Title: one week left for panaji assembly by election candidates gears up campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.