अमित शहांच्या सभाप्रकरणी हायकोर्टाची केंद्रीय सचिवांना नोटीस
By admin | Published: July 10, 2017 02:41 PM2017-07-10T14:41:55+5:302017-07-10T14:41:55+5:30
1 जुलै रोजी गोव्यातील दाबोळी विमानतळावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी चक्क विमानतळावर सभा आयोजित करण्यात आल्याची घटना गोव्यात गाजू लागली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 10 - 1 जुलै रोजी गोव्यातील दाबोळी विमानतळावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी चक्क विमानतळावर सभा आयोजित करण्यात आल्याची घटना गोव्यात गाजू लागली आहे. या सभेच्या विषयावरून कायद्याची लढाई सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या सभेच्या विषयावरून एका याचिकेच्या अनुषंगाने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव तसेच गोव्याचे मुख्य सचिव, पोलीस प्रमुख तसेच गोवा विमानतळ संचालक यांना सोमवारी नोटीस बजावली आहे.
विमानतळ ही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील जागा असते. अशा ठिकाणी शहा यांच्या स्वागतासाठी सभा घेतली गेल्याने गोव्यातील काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता आपल्याला विमानतळावर लग्नाचा स्वागत समारंभ आयोजित करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने विमानतळ प्राधिकरणास सादर करून विमानतळ संचालकांना निरूत्तर केले.
गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीगीज यांनी या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर याचिका सादर केली. अशा प्रकारे विमानतळावर सभा आयोजित करणे हे कायद्याचा भंग करणारे ठरत असल्याने या प्रकरणी चौकशी व्हावी व आयोजकांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी विनंती रॉड्रीगीज यांनी केली आहे.
न्यायालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. येत्या तीन आठवड्यांत त्यावर उत्तर द्यावे लागेल. दरम्यान, भाजपाने यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. आपले सगळे कार्यकर्ते शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जमले होते. तिथे झालेला कार्यक्रम हा उत्स्फुर्त आणि अनियोजित होता, असे भाजपाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांचे म्हणणे आहे.