सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:32 PM2019-03-18T14:32:22+5:302019-03-18T14:33:00+5:30

ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे

Managing Leaders with General Workers manohar parrikar | सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

सामान्य कार्यकर्त्यांशी भावबंध जपणारा नेता

googlenewsNext

- सद्गुरू पाटील
ज्या काळात गोव्यात भाजपचे काहीच बळ नव्हते व केवळ दोन किंवा तीन पंचायतींमध्येच भाजपचे सरपंच व पंच असायचे, त्या काळात मनोहर पर्रीकर यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याचे काम सुरू केले होते. पंच म्हणून किंवा सरपंच म्हणून एखादा कार्यकर्ता जर निवडून आला तर, पर्रीकर त्याच्याकडे जाऊन त्या कार्यकर्त्याचे अभिनंदन करत असत. खूप प्रारंभी श्रीपाद नाईक हे एकटेच आडपईमध्ये भाजपचे सरपंच होते. नंतरच्या काळात सदानंद शेट तानावडे वगैरे भाजप कार्यकर्ते सरपंच बनले. तानावडे हे पीर्ण पंचायतीवर निवडून यायचे. तिथे ते सरपंचही झाले होते, त्या वेळी पर्रीकर यांच्याविषयी आलेला अनुभव तानावडे अनेकदा सांगतात. पर्रीकरांनी प्रारंभीच्या काळात कायम सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला व तो संपर्क वाढवत नेला. म्हणून ते पूर्ण गोव्याचे नेते बनले. पायाला चक्रे लावल्याप्रमाणे पर्रीकर कायम गोवाभर खेड्यापाड्यांत फिरले. काणकोण किंवा सांगेच्या टोकाला सकाळी कधीही भाजपचा किंवा सरकारी कार्यक्रम असो. पर्रीकर त्या कार्यक्रमाला पोहचायचेच व दिवसभर कामासाठी वेळ देऊन रात्री उशिरा घरी पोहचले तरी, दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर त्यांचे काम पुन्हा सुरू व्हायचे. फार दुर्मिळ असे हे गुण आहेत, असे तानावडे नमूद करतात.
पर्रीकर त्या वेळी म्हणजे ९० च्या दशकात अनेकदा आमच्या घरी येत होते. आपले अभिनंदन करत असत. मी पंचायतीवर निवडून येतो, सरपंच होतो, याचे त्यांना त्या वेळी कौतुक वाटायचे. पर्रीकर यांनी भाजपमध्ये त्याकाळी मला प्रोत्साहन दिले. पर्रीकर एरव्ही कठोर दिसत असले तरी, ते काहीवेळा भावूकही व्हायचे व मी स्वत: तसा अनुभव घेतलेला आहे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अचानक मला रात्रीच्यावेळी तिकीट जाहीर केले गेले होते. ती निवडणूक मी हरलो. मात्र, नंतरची निवडणूक मी जिंकलो व आमदार झालो. पर्रीकर यांचे मार्गदर्शन मला कायम लाभले. भाजपचा एखादा सोहळा जर आयोजित करायचा झाला तर, पर्रीकर छोट्या छोट्या व्यवस्थापनातही बारकाईने लक्ष घालतात व सोहळा यशस्वी व्हावा म्हणून प्रचंड कष्ट घेतात, असा अनुभव मला मी राज्यस्तरीय पदाधिकारी बनल्यानंतरही कायम आला. ते मुख्यमंत्री म्हणून काम करताना खूप व्यस्त असायचे; पण पक्षाचा एखादा कार्यक्रम, सभा, मेळावा आयोजित करत असताना ते अनेकदा आम्हाला फोन लावून तयारी कुठवर पोहचली आहे याची माहिती घ्यायचे. ते कामय पक्षाचाच विचार करायचे, असे तानावडे सांगतात.
माझे लग्न ठरले तेव्हा बेळगावला लग्नाचे साहित्य आणण्यासाठी मला जायचे होते. मी तेव्हा साधा कार्यकर्ता होतो. तेव्हा भाजपमध्ये पर्रीकरांकडेच चारचाकी वाहन होते. मी बेळगावला जात असल्याचे पर्रीकरांना सांगितले व पर्रीकरांनी वाहन दिले. ते घेऊन मी लग्नाचे साहित्य घेऊन आलो होतो. त्याकाळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा प्रकारे पर्रीकर यांचा आधार वाटायचा, असे तानावडे यांनी सांगितले.

Web Title: Managing Leaders with General Workers manohar parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.