महाराष्ट्राच्या आरोग्य विमा योजनेचा गोव्यातील इस्पितळ प्रथमच भाग होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 02:15 PM2018-03-29T14:15:48+5:302018-03-29T14:15:48+5:30

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबवली जात असून गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे.

Maharashtra's health insurance scheme will be part of the hospital for the first time in Goa | महाराष्ट्राच्या आरोग्य विमा योजनेचा गोव्यातील इस्पितळ प्रथमच भाग होणार

महाराष्ट्राच्या आरोग्य विमा योजनेचा गोव्यातील इस्पितळ प्रथमच भाग होणार

Next

पणजी : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबवली जात असून गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. परिणामी महाराष्ट्रातील लोकांना या योजनेच्या लाभाचे कार्ड वापरून गोव्यातील गोमेकॉ इस्पितळात उपचार घेता येतील.

गोमेकॉ हे सरकारी इस्पितळ असले तरी, पूर्ण कोकणपट्ट्यात खासगी इस्पितळांकडे देखील ज्या सुविधा नाहीत, त्या सगळ्या गोमेकॉ इस्पितळामध्ये आहेत. हृदयरोगावरील उपचार येथे केले जातात. बायपाससह हृदयावरील अन्य सर्व प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया गोमेकॉत केल्या जातात. गोमंतकीयांसाठी या सगळ्या सेवा व उपचार मोफत दिले जातात. परप्रांतीयांकडून 20 टक्के शूल्क आकारावे असे प्रथमच ठरले व गेल्या जानेवारी महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली. अनेक विदेशी पर्यटक तसेच कारवार ते सिंधुदुर्गपर्यंततचे लोक गोमेकॉत येऊन उपचार घेतात. त्यांना थोडे शूल्क लागू झाल्यामुळे नाराजीची भावना सिंधुदुर्गमधून येणे सुरू झाले. दीपक केसरकर, नितेश राणे आदी अनेकांनी सिंधुदुर्गमधील लोकांकडून गोव्यात शूल्क आकारणी केली जाऊ नये अशी मागणी सुरू केली. मात्र गोवा सरकार ठाम राहिले.

आम्ही कुणालाच कधी उपचार नाकारले नाही. परप्रांतांमध्ये जे वाहन अपघात होतात, त्या अपघातांमधील रुग्णांवर तातडीने गोव्याच्या इस्पितळात मोफतच उपचार केले जातात, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी अलिकडे वारंवार सांगितले. मात्र सर्वच प्रकारच्या रुग्णांवर गोमेकॉत उपचार मोफत केले जावे अशी मागणी येऊ लागली. गोमेकॉमध्ये मुंबईतील डॉक्टरांच्या सहाय्याने किडनी रोपणाच्याही शस्त्रक्रिया पार पडतात. आतापर्यंत सोळा गोमंतकीय रुग्णांवर मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. गोमेकॉत यापुढे कॅन्सर रुग्णांवरील उपचार सुविधाही सुरू केली जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी गोव्याला 45 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

दरम्यान, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गोवा व महाराष्ट्रातही भाजपा सरकार अधिकारावर आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांवर गोमेकॉ इस्पितळात पैसे खर्च करण्याची वेळ येऊ नये या मागणीविषयी राणे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यासाठी ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेखाली गोमेकॉ इस्पितळ रुग्णांना मोफत सुविधा देईल, असे ठरले. म्हणजेच या योजनेच्या लाभाचे कार्ड गोमेकॉत रुग्णांनी स्वाईप करावे. थेट पैसे जमा होतील. महाराष्ट्र सरकार खर्चाचा भार उचलेल. यामुळे गोमेकॉचाही महसूल वाढणार आहे. गोमेकॉत आम्ही स्वाईप यंत्रे उपलब्ध करणार आहोत. सिंधुदुर्गमधील रुग्णांचा प्रश्न आता सुटला आहे, असे मंत्री राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Web Title: Maharashtra's health insurance scheme will be part of the hospital for the first time in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा