मिरामार किनारी रंगणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:05 IST2018-01-15T19:05:22+5:302018-01-15T19:05:43+5:30
पणजी येथील मिरामार किना-यावर उद्या १६ व परवा १७ रोजी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील २0 आणि विदेशातील २२ पतंग उडविणारे स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.

मिरामार किनारी रंगणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
पणजी - येथील मिरामार किना-यावर उद्या १६ व परवा १७ रोजी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील २0 आणि विदेशातील २२ पतंग उडविणारे स्पर्धक यात सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना या महोत्सवाचे इव्हेंट कॉर्डिनेटर अशोक नाईक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, डेनमार्क, फ्रान्स, न्युझिलँड, कॅनडा, तुर्की, आॅस्ट्रिया, इस्टोनिया आदी दहा देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. बेळगावचे माजी आमदार अभय पाटील यांच्या परिवर्तन परिवार संस्थेतर्फे गेली तीन वर्षे येथील मिरामार किना-यावर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन होत असून यंदाचे हे चौथे वर्ष आहे. या महोत्सवामुळे गोव्याला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
नाईक पुढे म्हणाले की, हा महोत्सव पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरला असून या काळात खास पतंग महोत्सवासाठी म्हणूनच येथे भेट देणारे पर्यटक मोठ्या संख्येने आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा पतंग महोत्सव होत असल्याने पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. यंदाचे आकर्षण म्हणजे रात्रीच्यावेळी पतंग उडविले जाणार आहेत. नाईट काइट फ्लाईंगमध्ये उद्या १६ रोजी सायंकाळी ६ ते ७.३0 या वेळेत मिरामार किनाºयावर पतंग उडविले जाणार असून ते एक विशेष आकर्षण ठरणार आहे. वेगवेगळ्या डिझाइनचे तसेच आकर्षक रंगसंगती असलेले पतंग उडविले जातील. लहान मुलांचेही ते दरवर्षी मोठे आकर्षण असते.
उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर परवा १७ रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप समारंभास गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई तसेच पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस सतीश कुलकर्णी, दीपक गोजागेकर व रोहित गांवस उपस्थित होते.