फलोत्पादन महामंडळाने अनुदानित दराने नारळ विक्री थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:24 IST2018-09-01T14:59:08+5:302018-09-01T15:24:48+5:30

गेल्या वर्षी नारळाचे दर वाढल्यानं सरकारनं अनुदानित दरानं नारळ विक्री सुरू केली होती

Horticulture Corporation stopped coconut sale at subsidized rates | फलोत्पादन महामंडळाने अनुदानित दराने नारळ विक्री थांबवली

फलोत्पादन महामंडळाने अनुदानित दराने नारळ विक्री थांबवली

पणजी : राज्यात नारळाचे दर पूर्वीएवढे राहिलेले नाही. आता दर थोडे कमी झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने आपल्या दालनांमधून अनुदानित दराने केली जाणारी नारळ विक्री थांबवली आहे. 

गेल्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात जेव्हा नारळाचे दर खूप वाढले होते. त्यावेळी महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. महागाईच्या काळातही सरकार लोकांना काहीच दिलासा देत नाही, अशी टीका करून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक रुपात नारळ विक्री सुरू केली होती. यामुळे सरकारने धावपळ करत गेल्या फेब्रुवारीत पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी अनुदानित दराने नारळ विक्री योजनेचा आरंभ केला होता. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 15 नारळ दिले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. योजना सुरू होताच लोकांनी फलोत्पादन महामंडळाच्या दालनात गर्दी केली. काही दालनांमध्ये पहिल्या दोन दिवसांतच सगळे नारळ संपले. जिथून नारळ मिळेल, तिथून फलोत्पादन विकास महामंडळ ते खरेदी करेल आणि त्या नारळांची कमी दरात विक्री करेल, असे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी जाहीर करतानाच ही योजना प्रथम दोन महिन्यांसाठी असेल असे म्हटले होते. 

फलोत्पादन महामंडळाने हजारो नारळांची विक्री काही दिवसांमध्ये केली. मात्र नारळाचे दर पूर्णपणे कमी होण्यापूर्वीच या योजनेची गती मंदावू लागली. महामंडळाला जास्त प्रमाणात नारळही वेगाने उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. बाजारपेठेत सध्या मध्यम आकाराच्या नारळाचे दर 25 रुपये आहे. एकदम छोटा नारळ वीस रुपयांना मिळतो. मोठे नारळ मात्र 30 व 35 रुपयांना विकले जात आहेत. गरीबांना अजुनही नारळ खरेदी परवडत नाही. त्यामुळे सरकारने फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांमधून अजुनही अनुदानित दराने निदान गरीबांना तरी नारळ विक्री सुरू ठेवायला हवी, अशा प्रकारचे मत लोकांमधून व्यक्त होत आहे.

फलोत्पादन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने मात्र नारळाचा दर आता थोडा कमी असल्याने आता दालनांमधून नव्याने विक्री सुरू करण्याची गरज नाही, असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले. नारळ उत्पादक शेतक:याला नारळावर केवळ पाच ते बारा रुपये मिळत असतात. आता नारळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. काही लोक पंधरा-वीस हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करतील व दोन हजार रुपयांची जीन्सदेखील वापरतील. पण नारळाचे दर किंचित वाढले तरी, महागाई वाढली असा दावा करतात, असे अधिकारी म्हणाले.

Web Title: Horticulture Corporation stopped coconut sale at subsidized rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा