पणजी : गोव्यात वाहतूक पोलिसांनी हायटेक मिशन हाती घेतले असून वाहतूक नियमांचा भंग करणाºयांचे फोटो, व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास इनाम दिले जाणार आहे. वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना वठणीवर आणण्यासाठी दक्ष नागरिकांनाच आता कर्तव्य बजावावे लागेल. 

वाहतुकीचे कोणतेही उल्लंघन आढळून आल्यास त्याचा फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवल्यास इनाम दिले जाईल. या विशेष योजनेचे उद्घाटन शुक्रवारी पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वाहतूक अधिक्षक दिनराज गोवेकर, उपाधीक्षक धर्मेश आंगले आदी उपस्थित होते. एकेरी मार्ग असताना वाहतूक नियम तोडून विरुध्द दिशेने वाहन हाकणे, पदपथ किंवा झेब्रा क्रॉसिंगवर वाहन पार्क करणे, दुचाकीवर तिघे बसून वाहन हाकणे, योग्य नंबरप्लेट नसणे, सीट बेल्ट परिधान न करणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे, काळ्या काचा असलेली मोटार आदी उल्लंघनांचे फोटो किंवा व्हिडिओ चित्रफित व्हॉट्सअॅपवर पाठवता येईल. तसेच सिग्नल तोडणे, बेदरकारपणे वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाइल फोन वापरणे आदी उल्लंघनांची व्हिडिओ चित्रफित पाठवता येईल. नियमभंग करणा-यांवर पोलिस कडक कारवाई करतील. 

मोबाइल नंबर ७८७५७५६११0 - 

मोबाइल नंबर ७८७५७५६११0 वर उल्लंघनाचे फोटो किंवा क्लिप पाठवता येईल. पण त्यासाठी आधी या नंबरवर मॅसेज पाठवून स्वत:ची नोंदणी करावी लागेल. स्वत:चे नाव, मोबाइल क्रमांक, व इमेल आयडी पाठवून नोंदवून नंतर फोटो पाठवता येतील. स्वत:चा मोबाइल क्रमांक हाच युनिक आयडी असेल. त्या क्रमांकाचा उल्लेख करावा लागेल. 

काय पाठवाल?

उल्लंघन दाखवणारा फोटो किंवा व्हिडिओ ज्यात वाहनाचा क्रमांक स्पष्टपणे दिसेल. उल्लंघनाचे वेळ, तारीख आणि ठिकाण, नेमके कोणत्या प्रकारचे उल्लंघन केलेले आहे या विषयीची माहिती फोटो किंवा व्हिडिओ क्लीप पाठवता येईल. 

काय आहे इनाम? 

उल्लंघन दाखवून देणा-या प्रत्येक बाबतीत ठराविक पॉइंटस् दिले जातील. त्यानुसार १00 पॉइंटस् झाल्यानंतर तक्रारदाराला १ हजार रुपये रोख इनाम दिले जाईल. १00 ते २00 पाँइंटस करणा-यांना सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर बंपर ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल. बक्षीस म्हणून स्कूटी दिली जाईल. 

पोलिस महासंचालक चंदर यांनी दिल्लीतही केला होता प्रयोग 

चंदर म्हणाले की, दिल्लीत असताना त्यांनी अशीच मोहीम राबवली होती परंतु ती मोठ्या स्वरुपाची होती. मारुती कार बंपर इनाम होते आणि या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. काही सुधारणा करुन गोव्यातही ही योजना राबवित आहोत. नागरिकांचा अधिकाधिक सहभाग करुन घेतला जाईल. 

तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल मात्र ज्याच्याबद्दल तक्रार आहे त्याने आव्हान दिल्यास तपासकामासाठी मात्र तक्रारकर्त्याने पोलिसांना सहकार्य करावे लागेल, असे चंदर यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात सरासरी रोज ४000 जणांना वाहतूक नियमभंग प्रकरणात चलन दिले जाते. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.