खवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 02:13 PM2018-10-12T14:13:23+5:302018-10-12T16:13:39+5:30

लुबान चक्रीवादळाचा प्रभाव गोव्यातून कमी झालेला असला तरी भरतीच्या पाण्यामुळे गोव्यातील बहुतेक किनारे तिस-या दिवशीही पाण्याखालीच होते.

Goa : The youth of Madhya Pradesh drowned in sea | खवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला

खवळलेल्या समुद्रात मध्य प्रदेशचा युवक बुडाला

googlenewsNext

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: लुबान चक्रीवादळाचा प्रभाव गोव्यातून कमी झालेला असला तरी भरतीच्या पाण्यामुळे गोव्यातील बहुतेक किनारे तिस-या दिवशीही पाण्याखालीच होते. दरम्यान, कळंगूटच्या खवळलेल्या दर्यात उतरलेल्या विश्वास नाईक या 19 वर्षीय मध्य प्रदेशच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात कोणीही जाऊ नये,असा इशारा दिलेला असतानाच तो इशारा धुडकावून मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कळंगूटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गुरुवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी 6.30 वाजता मध्य प्रदेशहून आलेला आठ मित्रांचा गट पाण्यात उतरला होता.

त्यावेळी दर्या खवळलेला होता. जोरदार लाटांनी त्यापैकी तिघांना खेचून आत नेले. दोघांनी पाण्याशी झुंज देऊन आपला जीव वाचविला. मात्र विश्वास आनंद नाईक (इंदूर-मध्य प्रदेश) हा पाण्यात खेचला गेला. पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम चालवल्यावर  शुक्रवारी(12 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता बागा बीचवरील समुद्रात त्याचा मृतदेह सापडला. शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा भरती आल्यामुळे उत्तर गोव्यातील मोरजी, मांद्रे, कळंगूट,कांदोळी, बागा तसेच दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, माजोर्डा, कांसावली या प्रसिद्ध किना-यांसह बाकीचे सर्व किनारे पाण्याखालीच होते.

दुपारी भरतीनंतर पाण्याची पातळी अधिकच वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरू नये यासाठी किना-यावरील जीवरक्षकांकडून प्रयत्न चालू होते. मात्र कित्येकजण त्यांना न जुमानता पाण्यात उतरताना दिसत होते. 14 ऑक्टोबरपर्यंत  समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे धोका वाढला असून पाण्यात कुणी उतरु नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

Web Title: Goa : The youth of Madhya Pradesh drowned in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.