गोवा विद्यापीठाच्या अभियंत्याला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 10:09 PM2018-04-05T22:09:51+5:302018-04-05T22:09:51+5:30

गोवा विद्यापीठाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अमित श्रीवास्तवला ५० हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. विद्यापीठाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तो ५ टक्के दलाली देण्याची सक्ती करून छळत होता. 

Goa University engineer arrested for taking bribe | गोवा विद्यापीठाच्या अभियंत्याला लाच घेताना अटक

गोवा विद्यापीठाच्या अभियंत्याला लाच घेताना अटक

googlenewsNext

पणजी: गोवा विद्यापीठाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अमित श्रीवास्तवला ५० हजार रुपयांची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. विद्यापीठाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तो ५ टक्के दलाली देण्याची सक्ती करून छळत होता. 
महिन्याकाठी ८० ते ९० हजार रुपये पगार असलेल्या या कार्यकारी अभियंत्याकडून गैरमार्गानेही पैसे कमाविणे चालूच होते. कोणताही किंतु, लाज, भीड भाड न ठेवता तो लाच मागत होता. गोवा विद्यापीठात स्वच्छतेचे कंत्राट मिळालेले पॅनोरमा एन्टरप्राईझचे मालक हेमा सुंदर रेड्डी यांच्याकडे ते लाचेची मागणी करीत होते. ते लाच देत नाहीत म्हणून असलेली नसलेली बारीक बारीक कारणे दाखवून ते कंत्राटदाराचा छळ करीत होते. त्यांनी  सादर केलेल्या बिलात त्रुटी दाखवित होते. ही बिले संमत करण्यात त्यांची भुमिका असल्यमुळे ती संमत करण्यासाठी लाच मागत होते. प्रत्येक बिलामागे बिलाच्या रकमेच्या ५ टक्के दलाली मागत होते. या तत्वावर  ५० लाख रुपयांच्या कंत्राटात त्यांना अडीच लाख रुपये दलाली होते. 
गोपी पेकेट नामक नागरिकाकडून या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे एसीबीने नियोजनबद्ध योजना आखून त्याला पकडण्याचा बेत केला. त्यासाठी या अभियंत्याला संशय येवू नये म्हणून त्याच्याकडे वाटाघाटी करून लाचेची रक्कम ५० हजारापर्यंत खाली आणून घेतली. ठरल्याप्रमाणे कारवाई करून त्याला पैसे घेताना पुराव्यासह पकडण्यात आले. 
पैसे देण्याची वेळही या अभियंत्यानेच ठरविली होती. सकाळी विद्यापीठात कार्यालयीन तास सुरू होण्यापूर्वी म्हणजे ९ वाजता त्याला ओशन पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे पैसे घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आपली मोहीम फत्ते केली. मुख्य म्हणजे श्रीवास्तव लाच मागताना आणि लाचेची रक्कम घेतानाही टिपला गेला आहे. भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नो्ंदविण्यात आला आहे. निरीक्षक फ्रांन्सीस कोर्त हे  या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या विद्यापीठातील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली आहे. तेथून काही ड्रॉवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच त्याच्या घरीही छापा टाकण्यात आला होता.

Web Title: Goa University engineer arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.