‘फ्लाइंग फ्रान्सिस’ लंडनला!
By admin | Published: November 5, 2014 02:17 AM2014-11-05T02:17:09+5:302014-11-05T02:20:01+5:30
महिनाभराचा दौरा : २२ नोव्हेंबरला परतणार
पणजी : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा पुन्हा विदेश दौऱ्यावर गेले असून या वेळी ते महिनाभर लंडनमध्ये राहणार आहेत. २२ नोव्हेंबरला ते गोव्यात परततील, असे सांगण्यात आले.
कुठल्याही राज्याचा उपमुख्यमंत्री एवढा काळ राज्याबाहेर राहिलेला नसेल. गेल्या अडीच वर्षांच्या काळात किमान वर्षभर तरी ते देशाबाहेरच राहिलेले आहेत. यापूर्वी कॅनडा दौऱ्यावर गेले असता, तेथे त्यांनी तीन महिने काढले होते. आॅस्ट्रेलिया, पोर्तुगाल, कॅनडा, जर्मनी आदी किमान आठ वेगवेगळ्या देशांचे दौरे त्यांनी याआधी केलेले आहेत.
उपमुख्यमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावर असताना ते एवढा काळ विदेशात राहतात, याबद्दल खुद्द एका सत्ताधारी आमदारानेही ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीकडे बोलताना आश्चर्य व्यक्त केले. केवळ नावापुरते उपमुख्यमंत्रिपद आहे, कोणतेही अधिकार त्यांच्याकडे नसावेत म्हणूनच कंटाळून ते विदेश दौरे करीत असावेत, अशी टीका या आमदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर केली.
विशेष म्हणजे डिसोझा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच महसूल, नगरविकास अशी महत्त्वाची खाती आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामे अडून राहतात. या दोन्ही खात्यांचे सचिव आपल्या अधिकारात काही कामे करून घेत असले, तरी महत्त्वाच्या कामांच्या फाइल्स डिसोझा यांच्या अनुपस्थितीमुळे अडकून पडतात.
डिसोझा यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता, त्यांचा हा दौरा खासगी असल्याचे सांगण्यात आले. डिसोझा हे पत्नी तसेच मुलांसह लंडनला स्वखर्चाने गेले आहेत, असाही दावा करण्यात आला.
(प्रतिनिधी)