अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:39 AM2018-09-26T11:39:39+5:302018-09-26T11:53:27+5:30

काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे.

Congress in Goa gives notice for removal of Assembly Speaker Pramod Sawant | अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती

अविश्वास ठरावाच्या नोटीशीवर लवकरच निर्णय घेणार - सभापती

Next

पणजी : काँग्रेसच्या सोळा आमदारांनी सही करून आपल्याला पदावरून काढण्यासाठी जी नोटीस दिली आहे. त्या नोटीसीविषयी मी बुधवारी सायंकाळी किंवा गुरुवारपर्यंत लवकरच निर्णय घेईन, असे गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी ( 26 सप्टेंबर ) सांगितले.

आझाद मैदानावर डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांच्या हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली वाहण्यासाठी सभापती सावंत आले होते. यावेळी मुख्य सचिव धमेंद्र शर्मा, गोवा मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी सभापती सावंत यांना नोटीसीविषयी विचारले. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी मिळून सभापतींविषयी अविश्वास दाखवला आहे. काँग्रेसने यापूर्वी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. तसेच सभापतींबाबत अविश्वास दाखवून त्यांना पदावरून हटविले जावे अशी मागणी करणारी नोटीस विधिमंडळ खात्याला सादर केली आहे. सभापती म्हणाले, की सध्या काही विधानसभा अधिवेशन नाही. त्यामुळे एक तर नोटीस आपल्याला अधिवेशनापर्यंत तशीच ठेवावी लागेल किंवा ती आता फेटाळून लावावी लागेल. विधिमंडळ खात्याचे सचिव उपलब्ध नव्हते म्हणून मी अजून त्यावर काही निर्णय घेतला नाही. आता मी पुढील चोवीस तासांत काय तो निर्णय घेईन व जाहीर करेन.

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अजुनही दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अनुपस्थितीत गोव्यात राज्यपालांमार्फत मंत्रिमंडळाचा  विस्तार घडवून आणला. मंत्रिमंडळ विस्तारावेळी सभापती सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जावे, असे सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचे  म्हणणे होते. सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. उपसभापती मायकल लोबो यांनाही  मंत्रीपद  न मिळाल्याने कळंगुटमधील भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सभापती किंवा उपसभापतींना मंत्रिपदी घेतले तर, रिक्त होणाऱ्या सभापती किंवा उपसभापती पदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. ती निवडणूक टाळण्यासाठी सरकारने ही पदे रिक्त होऊ दिली नाहीत, असे राजकीय गोटात मानले जात आहे.
 

 

Web Title: Congress in Goa gives notice for removal of Assembly Speaker Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.