पणजी : पक्षाचे काही नेते व मंत्री यांची नाराजी दूर करण्यासाठी गोवा प्रदेश भाजपाने व भाजपाच्या कोअर कमिटीच्या काही सदस्यांनी मोठी धडपड चालवली आहे. भाजपाचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे तर अजून नाराज असून त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकतीच पर्रीकर सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यानंतर लगेच सरकारमधील मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी भाजपामधील काही मंडळींना जाहीरपणे दोष दिला. आपण काहीजणांना आवडत नाही व आपल्याला डावलले जातेय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली. लगेच भाजपाच्या कोअर कमिटीचे सदस्य व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हे डिसोझा याना भेटून आले. त्यांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण  नाराजी दूर झालेली नाही.

तत्पूर्वी कोअर कमिटीचे आणखी एक सदस्य दत्ता खोलकर यांनी नाराज नेते पार्सेकर यांच्याशी बोलणी करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी तर थेट सरकारवर टीका करताना सरकारकडून सामान्यांचे प्रश्न सोडविले जात नाहीत अशी खंत व्यक्त केली. यामुळे भाजपामधील अस्वस्थता आणखी वाढली. स्वत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे त्यानंतर लोबो यांच्याशी बोलले व त्यांनी त्यांच्या नाराजीची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत भाजपासमोर प्रथमच नाराज नेते व मंत्री-आमदारांनी कठीण परिस्थिती निर्माण केली आहे. पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी असताना असे प्रथमच घडत आहे. पूर्वी पर्रीकर यांना घाबरून कुणी नाराजी व्यक्त करत नव्हते पण आता स्थिती तशी नाही.

मंत्री डिसोझा हे गोव्यातच आहेत पण ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत. आपण आणखी काही दिवसांनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाईन असे डिसोझा यांनी लोकमतला सांगितले. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक उद्या शुक्रवारी बोलविण्यात आली आहे. नाराज नेत्यांनाही त्या बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे. गेले बरेच दिवस भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झालेली नाही. भाजपाचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर व दयानंद मांद्रेकर यांनीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर याना भेटून नोकर भरती रद्दच्या पर्रीकर सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.