गोव्यातील बँक ऑफ इंडियातील सोने तारण घोटाळ्याची व्याप्ती 5 कोटींपेक्षाही अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:55 PM2019-02-06T14:55:43+5:302019-02-06T15:07:12+5:30

खोटे सोने तारण ठेऊन बँक ऑफ इंडियाच्या कित्येक शाखांकडून कर्ज घेऊन त्यांना गंडवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून हे प्रकरण म्हणजे एक मोठे रॅकेट असल्याचे सांगितले जाते.

BOI Gold Loan Scam in Goa went up to 5 crores | गोव्यातील बँक ऑफ इंडियातील सोने तारण घोटाळ्याची व्याप्ती 5 कोटींपेक्षाही अधिक

गोव्यातील बँक ऑफ इंडियातील सोने तारण घोटाळ्याची व्याप्ती 5 कोटींपेक्षाही अधिक

ठळक मुद्देखोटे सोने तारण ठेऊन बँक ऑफ इंडियाच्या कित्येक शाखांकडून कर्ज घेऊन त्यांना गंडवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून हे प्रकरण म्हणजे एक मोठे रॅकेट असल्याचे सांगितले जाते. कुंकळ्ळी, वेळ्ळी व चिंचोणे या तीन शाखांतून आतापर्यंत 21 जणांनी खोटे सोने तारण ठेऊन सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज उकळले होते.कुडचडे शाखेतून दोन महिलांनी सुमारे साडेअकरा लाखांचे कर्ज घेतले होते.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - खोटे सोने तारण ठेऊन बँक ऑफ इंडियाच्या कित्येक शाखांकडून कर्ज घेऊन त्यांना गंडवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून हे प्रकरण म्हणजे एक मोठे रॅकेट असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत बँक ऑफ इंडियाच्या गोव्यातील सहा शाखातील गफले उघड झाले आहेत. मात्र अजुनही अशी कित्येक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

बँकेचा सोन्याचा दर्जा तपासणारा व्हॅल्युएटर शाणू लोटलीकर या सराफाचा या रॅकेटमध्ये मुख्य सहभाग असून आतापर्यंत कुंकळ्ळी, वेळ्ळी, चिंचोणे, उतोर्डा, नावेली, कुडचडे येथील शाखांपाठोपाठ आता वार्का येथील शाखेतही असाच प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात बँकेने संपूर्ण तपशील पोलिसांना सादर करावा अशा सुचना कोलवाचे निरिक्षक फिलोमेन कॉस्ता यांनी बँक व्यवस्थापकांना केली आहे. त्यामुळे हा गंडा नेमका किती लाखांचा हे तक्रार दाखल झाल्यानंतरच समजू शकणार आहे.

कुंकळ्ळी, वेळ्ळी व चिंचोणे या तीन शाखांतून आतापर्यंत 21 जणांनी खोटे सोने तारण ठेऊन सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज उकळले होते. नावेली शाखेतून अशाच प्रकारे 11 जणांनी कर्ज घेतले होते. तर कुडचडे शाखेतून दोन महिलांनी सुमारे साडेअकरा लाखांचे कर्ज घेतले होते. हीच रक्कम सव्वाचार कोटींच्या घरात पोहचत असून अन्य काही शाखातही अशाच प्रकारे गौडबंगाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अटकेत असलेला सोनार शाणू लोटलीकर याच्याशी जवळीक असलेल्या काही व्यक्ती गावागावात जाऊन लोकांना भेटत असत. आपण तुम्हाला सोने देतो ते सोने तारण ठेऊन तुम्ही बँकेतून कर्ज काढा असे सांगितले जात असे. या तथाकथीत कर्जदारांकडे खोटे सोने देऊन हे कर्ज घेतले जात होते. त्यानंतर कर्जरुपाने घेतलेली रक्कम सर्वांना वाटून दिली जात होती. बनावट असलेले सोने अस्सल असल्याची ग्वाही बँकेचा व्हॅल्युएटर असलेला शाणू लोटलीकर देत असे.

कुंकळ्ळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे चिंचोणे येथील राजेश कारेकर या व्यक्तीने कित्येक जणांकडे अशारितीने संपर्क साधून त्यांना बँकेतून कर्ज घेण्यास भाग पाडले होते. त्याशिवाय नाईक या आडनावाच्या बाईनेही काहीजणांकडे आपण तुम्हाला सोने देते असे सांगून त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडले होते. कुडचडे येथे ज्या दोन महिलांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 11.39 लाखांचे कर्ज घेतले होते त्या दोघींकडेही अशाच एका महिलेने संपर्क साधला होता. तिच्याच सांगण्यावरुन या दोन महिलांनी कर्ज घेतले होते.

बँकेच्या सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे काही कर्जदार बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या कर्जाविषयी संशय आल्याने तारण ठेवलेले सोने दुसऱ्या एका सोनाराकडून तपासले असता ते बनावट असल्याचे दिसून आले. त्यानंतर लोटलीकर याने प्रमाणित केलेल्या सर्व दागिन्यांची तपासणी केली असता हे सर्व कारस्थान उघडकीस आले. सध्या हे बनावट सोने पोलिसांनी जप्त केले असून लवकरच ते तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवून देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: BOI Gold Loan Scam in Goa went up to 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.