पणजी: नोटाबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस प्रदेश कॉंग्रेसने मोर्चा काढून काळा दिवस म्हणून साजरा केला. सुमारे अडिचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा मोर्चा पणजीतील कॉंग्रेस हाऊसपासून निघाला आणि शहरात एक छोटी फेरी मारून पुन्हा कॉंग्रेस हाऊसजवळच विसर्जित झाला. मोर्चात पुरुषांबरोबर स्त्रीयाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. मोर्चेक-यांनी हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्धच्या घोषणांचे फलक होतेच, शिवाय दंडाला काळे कपडेही बांधण्यात आले होते. 
मोर्चा विसर्जित झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केलेल्या छोट्याशा भाषणातून केंद्र सरकारवर आणि पंतप्रधानावर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन्ही निर्णय लोकांना संकटात टाकणारे ठरले आहेत. लोकांचा रोजगार बुडाला आहे. लोक हलाखीचे जीवन जगत आहेत  असे त्यांनी सांगितले. जीएसटीच्या नावाखाली कर आकारणी नव्हे तर अक्षरश: लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनीही नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना लोकांना बँकांसमोर रांगेत उभे राहण्यासाठी या सरकारने प्रवृत्त केल्याचे सांगितले. काळा पैसा बाहेर काढण्यासोडी हा निर्णय घेण्यात आलाचा  सरकारचा दावा फोल ठरला आहे. किती काळा पैसा बाहेर काढला हे सरकारने जाहीर करावे. उलट रांगांत राहून लोकांना जीवही गमवावा लागला आहे असे त्यांनी सांगितले. 
आमदार रवी नाईक, फिलीप नेरी रॉड्रिगीश, विल्फ्रेड डिसा, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी खासदार फ्रांसिस्क सार्दीन व इतर नेते यावेळी उपस्थित होते.