बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:11 PM2023-06-09T15:11:20+5:302023-06-09T15:12:29+5:30

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले

Extortion of 35 lakhs by forged signature | बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

googlenewsNext

एटापल्ली (गडचिरोली) : ग्रामपंचायत तोडसांतर्गत येणाऱ्या ग्रामसभा कोष समितीच्या बॅंक खात्यांमध्ये असलेली सुमारे ३५ लाख ३ हजार ११६ रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने २० पेक्षा अधिक धनादेशांच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून हडप केली आहे. चाैकशी समितीने यासाठी ग्रामसेवक व ग्रामकाेष समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना जबाबदार धरत त्यांनी ही रक्कम समान हिश्शात भरून द्यावी, अन्यथा फाैजदारी कारवाई करण्याचा इशारा पंचायत समितीने पाठविलेल्या नाेटिसीमधून दिला आहे. या नाेटिसीमुळे एकच खळबळ माजली आहे.

ताेडसा ग्रामपंचायती अंतर्गत दाेड्डी स., आलेंगा, दाेड्डी म., ताेडसा, पेठा, एकरा बुज, एकरा खुर्द, झारेवाडा, कारमपल्ली, लांजी ही दहा गावे येतात. या दहा गावांचे सात ग्रामकाेष आहेत. या काेषात तेंदूपत्ता बाेनस व पाच टक्के अबंध निधी हाेता. विशेष म्हणजे प्रत्येक गावाचे स्वतंत्र बँक खाते आहे. ग्रामसेवक हे ग्रामकाेषाचे सचिव राहत असल्याने धनादेश ग्रामसेवक डी. झेड पिल्लारे यांच्याकडे राहत हाेते. हे धनादेश ग्रामकाेष अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षऱ्यांनी वठतात. सदर धनादेश ग्रामसेवकाच्या घरून गहाळ झाले. अज्ञात व्यक्तीने प्रत्येक खात्यात असलेली दीड ते दाेन लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग केली व हडप केली. विशेष म्हणजे दहा गावांचे तेंदूपत्ता बाेनस व अबंध निधीचे असे दाेन खाते असे एकूण २० बॅंक खाते आहेत. अज्ञात व्यक्तीने २०पेक्षा अधिक धनादेशांवर बॅंकेत वठवून त्याची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली.

हा प्रकार ऑक्टाेबर महिन्यात घडला. मात्र ग्रामसेवकाने या प्रकरणाची तक्रार केली नाही. ही बाब ग्रामकाेष समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने करण्यात आला आहे. धनादेशांवर ग्रामसेवक, ग्रामकाेष अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना जबाबदार धरत समप्रमाणात रक्कम दि. १० जूनच्या आत संबंधित बॅंक खात्यात जमा करावी. त्याची पाेचपावती पंचायत समितीला सादर करावी अन्यथा फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा नाेटिसीमधून दिला आहे.

अनेक बाबी अजूनही अस्पष्ट

हडप करण्यात आलेल्या ३५ लाख ३ हजार ११६ रुपयांचे २०पेक्षा अधिक धनादेश तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते करून रक्कम हडप करण्यात आली आहे. एवढ्या धनादेशांवर बनावट सही, शिक्के कसे काय मारण्यात आले. बनावट स्वाक्षरी व शिक्के बॅंकेच्या कर्मचाऱ्याला ओळखले कसे नाही? असा प्रश्न आहे. धनादेशांवर ग्रामकाेष अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या अगाेदरच स्वाक्षऱ्या असतील तर ग्रामसेवकाने या स्वाक्षऱ्या अगाेदरच का घेऊन ठेवल्या? असा प्रश्न आहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याची गरज आहे. तसेच ज्या खात्यात ही रक्कम वळती झाली ते खाते काेणाचे आहेत, याचा तपास पाेलिसांत तक्रार देऊन करण्याची गरज आहे.

Web Title: Extortion of 35 lakhs by forged signature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.