सर्वांच्या सहकार्यानेच जिल्ह्याचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:22 PM2017-08-16T23:22:07+5:302017-08-16T23:23:16+5:30
सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झाला आहे. येणाºया काळात देखील ‘आम आदमी’ केंद्रस्थानी माणून गडचिरोली जिल्ह्यात विकास गंगा पुढे जाईल, यादृष्टीने आपण सारे प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे वने, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापनदिनी मंगळवारला जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोहळ्यात पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. एटबॉन, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, जिल्ह्यात यापूर्वीच्या शेती कर्जात माफी देण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रूपयांची कर्जमाफी दिली जात आहे. तसेच हवामानाचा फटका बसून होणारे नुकसान टाळावे, याकरिता शेतकºयांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात वनहक्क पट्टे वितरण कामातही प्रशासनाने विक्रमी कामगिरी केली आहे. ३० हजार ८७२ पेक्षा अधिक वैयक्तिक पट्टे आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. पेसाअंतर्गत गावे जाहीर करण्याचे कामही प्रशासनामार्फत गतीने सुरू आहे. जिल्ह्यात १२४ गावांना पेसा गावे म्हणूून घोषित करण्यात आली आहे. याबाबतीत गडचिरोली जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या खालोेखाल राज्यात दुसºया व नागपूर विभागात पहिल्या क्रमांकावर आहे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून आतापर्यंत १८.२० लक्ष मनुष्य दिवस रोजगार निर्मिती साध्य करण्यात आली असून यावरील खर्च ६८.३१ कोटी रूपये आहे. सद्य:स्थितीत ४१२ कामे सुरू असून साप्ताहिक सरासरी १६ हजार ६०७ मजूर नरेगाच्या कामावर आहेत, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नियोजन मंडळाच्या माध्यमातून १७२ कोटी ३ लक्ष रूपयांचा आराखडा यंदा मंजूर करण्यात आला आहे. यात सर्वाधिक तरतूद सामूहिक सेवांवर करण्यात आलेली असून जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदींसाठी यंदा विशेष निधी देण्यात आला आहे. आदिवासी उपयोजनेसाठी ३४६ कोटी ३६ लाख रूपयांपेक्षा अधिक निधी नियोजन मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
छत्तीसगड राज्याला जोडणाºया इंद्रावती नदीवरील मोठ्यापुलाचे बांधकाम पातागुडम येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू झाल्यामुळे गतिमान झाले आहे. जून २०१८ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच आरमोेरी, कुरखेडा, सिरोंचा, चामोर्शी येथे न्यायालयीन इमारती यावर्षात पूर्ण करून लोकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील महसूूल मंडळाच्या एकूण ४० प्रशासकीय इमारतीपैकी पूर्ण झालेल्या २६ इमारती महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे व कमु तायडे यांनी केले.
विक्रमी धान खरेदी
धान हे गडचिरोेली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. जिल्हा प्रशासनाने वेळेत धान खरेदी केंद्राचे नियोजन केल्यामुळे यंदा विक्रमी साडेनऊ लाख क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. सदर धान खरेदीपोटी १३० कोटी रूपये शेतकºयांना आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले. बोनसचीही प्रक्रिया गतीने करण्यात आली.
तलाव तेथे मासोळी योजना कार्यान्वित
जिल्ह्यात मासेमारी करणाºया परिवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांच्या उपजीविकेसाठी ‘तलाव तिथे मासोळी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. यातून गावातच रोजगाराची संधी मिळण्यासोबतच सकस प्रथिनेयुक्त आहार उपलब्ध होऊन कुपोषणाची समस्या सोडविण्यास हातभार लागणार आहे, याची मला खात्री आहे, असे पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले.
महिला रुग्णालय लवकरच सुरू होणार
गडचिरोलीत महिला रुग्णालयाची इमारत उभी आहे. मात्र उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होईपर्यंत या रुग्णालयाचे उद्घाटन करू नये, अशी भूमिका आपण घेतली होती. आता शल्यचिकित्सक व कर्मचाºयांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या अधिनस्त इतर पदांची या रुग्णालयात पदभरती होणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय सुरू होऊन नागरिकांना आरोग्य सेवा मिळेल, असे पालकमंत्री म्हणाले.
ग्राम स्वच्छता पुरस्काराने तीन ग्रामपंचायती सन्मानित
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत जिल्हास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त तीन ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार रोख पाच लाख रूपये धानोरा तालुक्यातील जांभळी ग्रामपंचायतीला मिळाला. तीन लाख रूपयांचा द्वितीय पुरस्कार कुरखेडा तालुक्यातील खरकाडा तर रोख दोन लाखांचा स्वच्छता पुरस्कार कुरखेडा तालुक्यातील मालदुगी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार संबंधित ग्रा. पं. चे सरपंच व सचिव यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून स्वीकारला.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होणार
आदिवासी विकास विभागातर्फे जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. दहा इमारतीचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. आणखी आठ इमारतीचे लवकरच लोकार्पण होईल. आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमधून शिक्षण देण्यास आदिवासी विकास विभागाने सुरुवात केली आहे. या विद्यार्थ्यांमधून उत्तम अधिकारी घडावे, यासाठी लवकरच गडचिरोेली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची व्यवस्था शासनातर्फे करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री आत्राम यांनी सांगितले.
पाच हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन
शेतकºयांना सिंचन सुविधेचा लाभ देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड करून ही सर्व गावे जलयुक्त करण्यात आली. यावर्षाकरिता जिल्ह्यातील १६९ गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाच्या कामासाठी करण्यात आली आहे. जलसंधारणाच्या कामातून पाच हजार हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यातही शेती लागवड करणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री आत्राम यांनी सांगितले.
४४ गावांत आॅनलाईन सातबारा देण्यास प्रारंभ
जिल्ह्याच्या चामोेर्शी तालुक्यातील २३, कोरची तालुक्यातील १३ व अहेरी तालुक्यातील ८ अशा एकूण ४४ गावांमध्ये आॅनलाईन सातबारा देण्याच्या दृष्टिकोनातून संगणकीय प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. आता या सर्व गावात १५ आॅगस्टपासून आॅनलाईन सातबारा देणे सुरू होत आहे, अशी घोषणा पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी केली.