Fashion: Demonstration of stylish skirts! | Fashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणींमध्ये डिमांड !

आजदेखील आपल्या वार्डरॉबमध्ये स्कर्टचे कलेक्शन असेलच. मात्र आपण जो स्कर्ट परिधान करीत आहेत तो आपणास सूट होतो का? याचाही विचार करायला हवा. फक्त दाखविण्यासाठी किंवा फॅशन ट्रेंड सुरु आहे म्हणून कोणताही स्कर्ट वापरु नये. शरीराच्या ठेवणीनुसारच स्कर्टचा वापर करावा. तरच आपले व्यक्तिमत्त्व खुलेल आणि सौंदर्यात भरदेखील पडेल.  

मराठमोळा परकर किंवा घागरा हे झाले आपले पारंपरिक भारतीय कपडे. त्यालाच थोडा हटके टच देऊन, त्यापासून तयार झालेल्या स्टायलिश स्कर्टनी सध्या मुलींना भुरळ घातली आहे. त्यामुळे त्याची जोरदार हवा आहे... 

लांब लेहंगा किंवा लांब स्कर्टची. एथनिक स्टाइलमध्ये असणारे हे स्कर्ट तरुणींचं लक्ष वेधून घेताहेत. यामध्ये नेट, कॉटन, सिल्कचे बरेच पर्याय आहेत. फ्लोरल प्रिंटला तर तुफान मागणी आहे. सध्या तर दुपट्टे, स्कर्ट, टॉप्स, जॅकेट, चपला, शूज, बॅग सगळीकडेच फ्लोरल प्रिंट पाहायला मिळतेय. या फ्लोरल प्रिंटचा घेरदार स्कर्ट घागरा म्हणून, तर त्यावर चोळी म्हणून क्रॉप टॉप हे कॉम्बिनेशन उत्तम दिसेल. 

काळ्या रंगाचा स्लिव्हलेस क्रॉप टॉप, त्याखाली निळ्या किंवा हिरव्या, लाल, पिवळ्या, पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यावर विरुद्ध रंगाची ओढणी घ्यायला विसरू नका. ही ओढणी जराशी झगमगीत असू द्या. 

काळ्या रंगाचा टॉप असल्याने यावर सोनेरी किंवा आॅक्साइडची ज्वेलरी फारच खुलून दिसेल. आॅक्साइडचे दागिने एथनिक आणि आधुनिकही लुक देतात. तुम्ही सोनेरी, चंदेरी रंगाचे दागिने किंवा कंठहारही घालू शकता. बिड्सच्या दागिन्यांचाही पर्याय आहे. सध्या बांगड्या आणि ब्रेसलेटमध्येही वैविध्य दिसतेय. पारंपरिक लुक देणारे ब्रेसलेट वापरल्यास तुमचा लुक आणखीच खुलून दिसेल. स्कर्ट आणि क्रॉप टॉपवर हे उठून दिसेल. सोबत अँक्लेट आणि मोठे झुमके घालायला विसरू नका.  
Web Title: Fashion: Demonstration of stylish skirts!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.