विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

By रवी ताले | Published: January 30, 2018 12:20 AM2018-01-30T00:20:40+5:302018-01-30T00:20:45+5:30

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी तर अवघड आहेच; पण तो सर करताना भाजपाचाही चांगलाच घाम निघणार आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेससाठी मात्र पुनरागमनाची ही उत्तम संधी असणार आहे.

 Vidarbha's fort is difficult for Shiv Sena! | विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

Next

कुणाच्या डोळ्याची पापणी प्रथम लवते, असा एक खेळ लहान मुले खेळत असतात. गत विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान तोच खेळ सुरू होता. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. युतीचा पोपट कधीच मेला होता. ती बातमी कोण फोडणार, एवढाच काय तो प्रश्न होता! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित करून, त्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात वळवळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले असले तरी, त्या उत्तराने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. भाजपा आणि शिवसेनेने १९८९ पासून महाराष्ट्रात युती करूनच प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. अपवाद फक्त २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचा! त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवायची म्हटल्यास, १९८९ पासून ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलीच नाही, त्या मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध घेण्यापासून, मतदारसंघाची बांधणी करण्यापर्यंतचे आव्हान, उभय पक्षांना पेलावे लागणार आहे.
विदर्भापुरता विचार करायचा झाल्यास, शिवसेनेसाठी हे आव्हान तुलनात्मकरीत्या अधिक अवघड असणार आहे. त्यातही पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील वाटचाल सेनेसाठी अधिकच खडतर सिद्ध होणार आहे. लोकसभेचा रामटेक व विधानसभेचा वरोरा मतदारसंघ वगळता, सेनेचा पूर्व विदर्भात कुठेही दबदबा नाही. लोकसभेचा विचार केल्यास, पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ हे तीन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत आणि तिन्ही मतदारसंघांमध्ये सेनेचा बºयापैकी वरचष्माही आहे. पूर्व विदर्भात मात्र रामटेक वगळता सेनेला कधीच यश लाभले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १९८९ पासून २०१४ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सेनेला भाजपाची साथ होती. आता स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविताना, ताब्यातील मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणे, सेनेसाठी सोपे असणार नाही.
सेनेच्या तुलनेत भाजपासाठी विदर्भ सोपा असला तरी, एकाच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व सेनेला अंगावर घ्यायचे असल्याने, भाजपालाही चांगलाच घाम गाळावा लागेल, हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत सेना भाजपाच्या साथीला होती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. आगामी निवडणुकीत भाजपा व सेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतील, तर काँग्रेस व राकाँची आघाडी कायम असेल. भरीस भर म्हणून भाजपाच्या काही आमदार-खासदारांचाच पक्षाविषयी भ्रमनिरास होऊ लागला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गटबाजीही मोठ्या प्रमाणात उफाळली आहे. वरून विदर्भवाद्यांची नाराजी आहेच!
 
 

Web Title:  Vidarbha's fort is difficult for Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.