किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:05 AM2019-04-26T04:05:06+5:302019-04-26T04:09:23+5:30

या भेटीतून जसे रशिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांचे वाढते महत्त्व दिसून येते तसेच ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरिया धोरणाला चपराक असल्याचे मानले जाते.

kim jong un meets Russian President vladimir putin setback for us president donald trump | किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप

किम-पुतीन भेटीतून ट्रम्प यांना चाप

googlenewsNext

- अनय जोगळेकर

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जाँग उन यांनी २५ एप्रिल २०१९ रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदर व्लादिवोस्तोक येथे भेट घेतली. दोघा नेत्यांनी प्रथम एकांतात चर्चा केली आणि त्यानंतर शिष्टमंडळांसोबत चर्चा केली. या भेटीनंतर पुतीन बीजिंगमध्ये पार पडणाऱ्या दुसऱ्या बेल्ट-रोड परिषदेला रवाना झाले. या भेटीतून जसे रशिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांचे वाढते महत्त्व दिसून येते तसेच ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरिया धोरणाला चपराक असल्याचे मानले जाते.



घटणारी लोकसंख्या, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि शस्त्रास्त्रांखेरीज व्यापारासाठी कोरियाकडे काही नाही. पण अफगाणिस्तान आणि इराकमधील नामुष्कीनंतर आणि खासकरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेची वाढती आत्ममग्नता यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर निर्माण झालेली पोकळी व्लादिमीर पुतीन यांच्या रशियाने मोठ्या प्रमाणावर भरून काढली आहे. अध्यक्ष होण्यापूर्वी केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेत अधिकारी असलेल्या पुतीन यांनी समोरच्या देशांचे कच्चे दुवे ओळखणे आणि रशियाच्या उपद्रवमूल्यतेचा प्रभावी वापर करून घेणे हे शक्य करून दाखवले आहे. आज पश्चिम आशियातील अनेक समस्यांमध्ये रशिया मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.



शीतयुद्धाच्या सुरुवातीला कोरियाची साम्यवादी उत्तर आणि लोकशाही-भांडवलशाहीवादी दक्षिण अशी विभागणी झाल्यानंतर उत्तर कोरियात गेली सात दशके आणि तीन पिढ्या किम घराण्याची अनिर्बंध सत्ता आहे. सुरुवातीच्या काळात सोव्हिएत रशिया आणि शीतयुद्धानंतर चीनच्या पाठिंब्यामुळे उत्तर कोरियातील राजवट तगून राहिली. किम जाँग उन यांनी २०११ साली वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी आपल्या वडिलांच्या निधनानंतर सत्ता मिळवली. फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांनी आपल्या राजवटीतील पहिली आणि कोरियाची तिसरी अणुचाचणी केली. डिसेंबर २०१३ मध्ये स्वत:च्या काकांना देशद्रोहाचा आरोप ठेवून देहदंड देण्यात आला. फेब्रुवारी २०१७ मध्ये उन यांनी त्यांचा सावत्र भाऊ किम जाँग नाम याची मलेशियाच्या कौलालंपूर विमानतळावर नर्व एजंटचा वापर करून हत्या करण्यात आली. अवकाशात रॉकेट सोडून आपली क्षेपणास्त्रे आता अमेरिकेतील शहरांचाही वेध घेऊ शकतात, असा दावा केल्यानंतर उन यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये उत्तर कोरियाला अण्वस्त्रसज्ज देश म्हणून घोषित केले. २०१६ सालच्या निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे विजयी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात एक व्यापारी म्हणून सौदेबाजी करण्याच्या आपल्या कौशल्याला विशेष महत्त्व दिले. त्यासाठी असे कारण पुढे केले गेले की, परराष्ट्र विभागातील राजनैतिक अधिकारी अनेक दशकांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करू शकत नाहीत.



ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात किम जाँग उन यांच्या आक्रमकतेला तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिल्याने कोरियन द्वीपकल्पात युद्ध होणार का, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण युरोप आणि चीनशी पुकारलेल्या व्यापारी युद्धांमुळे टीकेची झोड उठलेल्या ट्रम्प यांनी परराष्ट्र संबंधांत आपले कर्तृत्व दाखवून देण्यासाठी किम यांच्याशी संपर्क साधला. २०१८ च्या सुरुवातीपासून चित्र अचानक पालटायला लागले. किम जाँग उन यांनी दक्षिण कोरियाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जै इन यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ९ ते २५ फेब्रुवारी २०१८ या कालावधी दरम्यान दक्षिण कोरियातील प्येओंगचाँग शहरात आयोजित केलेल्या हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धांच्या निमित्ताने अमेरिका आणि दोन कोरियांचे नेते एकत्र आले. उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांमध्ये बैठक होणार असतानाच ट्रम्प यांनी आपण किम जाँग उनना भेटणार असल्याचे घोषित केले. ट्रम्प यांच्या धोरणावर त्यांच्या विरोधकांनी जोरदार टीका केली. पण कोणाचे न ऐकता ट्रम्प १२ जून २०१८ रोजी किम यांच्याशी भेटले. या चर्चेत काय ठरले याचे पूर्ण तपशील प्रसिद्ध न करताच चर्चा यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.



असे म्हणतात की, उत्तर कोरियाने स्वत:ची अण्वस्त्रे आणि दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे नष्ट केल्यास त्याच्याविरुद्धचे निर्बंध मागे घेऊन, त्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी तसेच तेथे गुंतवणूक करण्यात अमेरिका पुढाकार घेईल, अशी काहीशी ऑफर ट्रम्प यांनी किम जाँग उन यांच्यापुढे ठेवली होती. या बैठकीनंतर कोरियाच्या आक्रमकतेला लगाम बसला असला तरी चर्चेची गाडी पुढे सरकत नव्हती. त्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्रम्प यांनी किम यांच्याशी व्हिएतनाममध्ये दुसरी भेट घेतली. पण चर्चेची ही फेरीसुद्धा निष्फळ ठरली. आपला अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळणाऱ्या सद्दाम हुसेन यांची राजवट कशी उलथवून टाकण्यात आली. सिरियात बशर असाद यांची कशी वाताहत झाली यांची उदाहरणे असल्याने किम आपली अण्वस्त्रे सहजासहजी मोडीत काढणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी चीन आणि रशियाकडूनही आपल्या राजवटीला स्थैर्याचे आश्वासन पदरी पाडण्याचा उन यांचा प्रयत्न आहे. जानेवारी २०१८ मध्ये किम जाँग उन आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी चीनला गेले होते. त्यांची रशिया भेट याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: kim jong un meets Russian President vladimir putin setback for us president donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.