धंद्याचे गणित चुकले की, हे हाेणारच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 09:46 AM2023-08-06T09:46:48+5:302023-08-06T09:47:14+5:30

व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?,अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. 

If the business math is wrong, this will happen! | धंद्याचे गणित चुकले की, हे हाेणारच!

धंद्याचे गणित चुकले की, हे हाेणारच!

googlenewsNext

नितीन वैद्य, निर्माता व व्यावसायिक

मराठी माणूस आणि व्यवसाय हे एकेकाळी व्यस्त प्रमाणाचे गणित समजले जायचे. मात्र, जागतिकीकरणाचे क्षितिज जसे विस्तारत गेले तसतसा अनेक नव्या क्षेत्रांचा विकास होऊ लागला. नवीन क्षेत्र तयार होऊ लागली. त्यात अमर्याद संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि नोकरीच्या मानसिकतेमधील मराठी माणूस मग उद्योजक व्हायची स्वप्न पाहू लागला. व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?, अर्थव्यवस्थेच्या दिवसागणिक झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. अशा परिस्थितीत उद्योजक देशोधडीला लागतो किंवा असह्य ताणापोटी मरणालाही जवळ करतो. 

यश आणि अपयश यांचा मेळ अर्थशास्त्राच्या तागडीत तोलायचा असतो आणि त्यामुळे ‘अर्थभान’ हा प्रमुख गुण उद्योजकाने जोपासणे गरजेचे आहे. मुळामध्ये व्यवसाय करताना एक व्यापक दृष्टिकोन हवा, आपले पैसे येतात कुठून, ते जातात कुठे, आपला खर्च किती, उत्पन्न किती, आपल्या विस्ताराच्या योजनांसाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज आपण उद्योगातील दैनंदिन आर्थिक भार सहन करताना कशी करणार आहोत, आपण कर्ज काढले असेल तर त्याच्या नियोजनबद्ध परतफेडीची आपण योजना आखली आहे का?, याचा साधकबाधक विचार जोपासणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्राची आपल्याला उत्तम माहिती असली तरी आपल्या क्षेत्राशी निगडीत जे अर्थशास्त्र आहे, त्याची आपल्याला माहिती आहे का?, अशा साऱ्या प्रश्नांना सतत मनात घोळवत ठेवणे गरजेचे आहे. जरी आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांसाठी आपल्याकडे तज्ज्ञ कर्मचारी असले तरी मूळ जो मालक आहे त्याला देखील अर्थभान असणे गरजेचे आहे. 

आर्थिक शिस्तीशी निगडीत असे अनेक मुद्दे आहेत, ज्यांचे काटेकोर पालन करणे नितांत गरजेचे आहे. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडत आहे. पण, याचा अर्थ काय, कोणत्याही क्षेत्रातील उद्योग असो आणि त्या उद्योगाचे आकारमान लहान-मोठे कसेही असो. जोपर्यंत कार्यालयीन व्यवहारात पारदर्शकता, जागतिक दर्जाच्या व्यवस्थांचे काटेकोर व शिस्तबद्ध पालन होत नाही, तोपर्यंत तो उद्योग कधी सावरला जात नाही. जर उद्योगनिहाय आवश्यक कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन झाले तर तुमच्या कंपनीची विश्वासार्हता वाढते. त्यामुळेच आज कोणत्याही क्षेत्रातील उद्योजक असो, आर्थिक शिस्त, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कॉम्प्लायन्स या तीन मुद्यांचे काटेकोर पालन त्याने अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, व्यवसायाचे गणित कोलमडण्यास फारसा वेळ लागणार नाही. जाता जाता एवढेच अधोरेखित करायचे आहे की, व्यवसाय करताना जिभेवर साखर हवी आणि डोक्यावर बर्फ!

  • जागतिकीकरणानंतर आता केवळ भारतात नव्हे तर जागतिक अर्थकारणाने शिस्तीचे जे लिखित-अलिखित नियम आखले आहेत त्यांची परिपूर्तता (कॉम्प्लायन्स) आपण करतो का, याचे चिंतन व अनुषंगिक कृती उद्योजकाने करायला हवी. 
  • आपल्या वैयक्तिक पातळीवरील खर्चामध्ये आपण वर-खाली करतो. मात्र, व्यवसाय करताना असे करून चालत नाही. तसे झाले तर व्यवसायाचे चाक कधी रुतेल याचा भरवसा नाही. 
  • उदाहरणाने सांगायचे तर, मी ज्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे तिथे १८ टक्के जीएसटी आहे. आमच्या कलावंतांना जे मानधन देतो त्याच्या जीएसटीची रक्कम देखील आम्ही त्यांना देतो. मात्र, आपल्याला हे अधिकचे पैसे हे करापोटी मिळाले असून ते आपल्याला भरणे सक्तीचे आहे, याचेच भान अनेकांना नसते. 
  • परिणामी ते कलावंतही अडचणीत येतात आणि आमच्यासारखे निर्माते जे त्यांना पैसे देतात तेही अडचणीत येण्याची शक्यता असते. जीएसटी हा एक मुद्दा आहे. 

Web Title: If the business math is wrong, this will happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.