खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 05:08 AM2018-09-09T05:08:06+5:302018-09-09T05:08:29+5:30

कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे.

Gautam Hari Singhania's special dialogue with Lokmat will take away Rs 2,000 crore from Khadi industry | खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

खादीचा उद्योग नेणार २ हजार कोटींपर्यंत, गौतम हरी सिंघानिया यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

googlenewsNext

दिनकर रायकर
मुंबई : कापड उद्योगाचा ब्रँड बनविणाऱ्या रेमंड समुहाने शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आमच्या उद्योगाने खादी व लिनन कापड व्यवसायात प्रवेश केला आहे. भविष्यात खादीचा उद्योग २ हजार कोटीपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जगात या ब्रँडची ख्याती आहे. ‘एक परिपूर्ण माणूस’ (ए कम्प्लीट मॅन) असे रेमंडचे घोषवाक्य आहे. आम्ही गरिबापासून अतिश्रीमंतांपर्यंत कपडे बनवतो. आमच्याकडे ११३ रुपये मीटरपासून ते ७ लाख ५० हजार रुपये मीटरपर्यंतचे कापड बनते. जगातले सर्वात चांगले कापड आम्ही बनवतो. देशातल्या ३८० हून अधिक शहरांत आमची १२१२ स्टोअर्स आहेत. २० हजार रिटेलर्स आहेत. महाराष्टÑात १२६ स्टोअर्स आहेत व देशात ९५३ विशेष स्टोअर्स आहेत. आता कमी लोकसंख्येच्या शहरांतही आम्ही व्यवसाय नेत आहोत असेही सिंघानिया म्हणाले.
खादी व लिनन हे प्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत व ते आरोग्यासही पोषक आहेत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले, कंपनी ‘कापड निर्मिती’ या पारंपरिक उत्पादनावर अवलंबून राहणार नाही. आता ‘एथ्निक’ वस्त्रांवर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे सांगून सिंघानिया म्हणाले की, जगात या कपड्यांचा बाजार ५ हजार कोटींचा आहे.
आम्ही आमच्या अनेक शोरुममध्ये अत्यंत प्रशिक्षित टेलर्स ठेवले आहेत. ते तुमच्या आवडीचे, हवे तसे शर्ट, पॅन्ट्स, सुट्स शिवून देतात. शेरवानी, जॅकेट, लग्नासाठीचे सुटही शिवून दिले जातात. ‘मेक टू आॅर्डर’ जॅकेटची किंमत १४ लाखापर्यंतही
आहे. लोकांची आवड बदलत आहे. त्यामुळे
त्यांना हवे ते देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिंघानिया म्हणाले.
महाराष्टÑात रेमंडचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही अमरावतीची निवड केल्याचे सांगून ते म्हणाले
की, रेमन्ड्सने अनेक वर्षांनी मोठी भांडवली गुंतवणूक या वस्त्रोद्योग पार्कमधील कारखान्यात केली आहे. तिथे सध्या फक्त धागे तयार होत असले तरी शर्टिंग, खादी, लिनेन अशा विविधांगी उत्पादनाची पूर्ण साखळी तिथे उभी केली जाईल.
सांगली, चिपळूण, रत्नागिरी, नांदेड या उद्योगदृष्ट्या मागास शहरांमध्येही आम्ही व्यवसाय सुरु करत आहोत. मात्र आपल्या कामगार कायद्यांची अवस्था दयनीय आहे. त्यात आमुलाग्र बदल करावेच लागतील असेही सिंघानिया यांनी निक्षून सांगितले. उद्योगांमध्ये शिस्त आणायला हवी व ही शिस्त येण्याआधी उद्योगांची उत्पादकतासुद्धा वाढयलाच हवी असेही सांगून ते म्हणाले की, आमचे महाराष्टÑात
१२९६४ तर देशभरात २५०८८ कर्मचारी आहेत.
इंजिनीअरिंग आणि आॅटोमोबाइल्समध्ये आम्ही व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही कंडोमच्या व्यवसायात १९९१ मध्ये प्रवेश केला. ‘कामसूत्र’ हा ब्रॅन्ड आज लोकांच्या ‘कामजीवनात’ आनंद निर्माण करीत आहे, असे ते म्हणाले.
सिंघानिया यांनी स्वत:च्या तीन आवडी सांगितल्या. सकाळी उठून व्यायाम, दिवसभर व्यवसाय आणि मोटार स्पोर्टसचा आनंद या तीन आवडी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कशात लक्ष घालण्यात मला वेळ नाही असे त्यांनी सांगितले.
तुमचे वडिलांशी मालमत्तेवरून वाद झाले, असे विचारले असता ते हसत हसत म्हणाले, असे वाद तर घराघरात असतात. आम्ही त्याला अपवाद कसे राहू? पण आमच्या कुटुंबाचा नावलौकिक असल्याने माध्यमांनी हा विषय लावून धरला. मला त्याविषयी काहीच बोलायचे नाही.
>होय, मराठी
येते की!
एवढी वर्षे महाराष्टÑात आहात, मराठी येते की नाही? असे विचारले असता शुद्ध मराठीत ‘हो, मराठी येते की,’ असे उत्तर त्यांनी दिले. माझे वडील खेळाडू होते, मीही खेळाडू आहे. खेळावरील प्रेमापोटीच आम्ही देशातील खेळाडूंसाठी कपडे तयार करतो. जागतिक पातळीवरील खेळाडूंचे खेळाव्यतिरिक्त अधिकृत कपडे रेमंडचे असतात असेही सिंघानिया आवर्जून म्हणाले.
>तीन वर्षांत कर्जमुक्त होऊ : वस्त्रोद्योगाची ९३ वर्षांची परंपरा व अनुभव पाठीशी असलेल्या रेमन्ड्स कंपनीच्या डोक्यावर २००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जापोटी कंपनीला दरवर्षी काही कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येत आहे. पण अमरावतीचा कारखाना कंपनीला कर्जातून बाहेर काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, एकदा उत्पादनांची पूर्ण साखळी तिथे उभी राहिली की, भांडवली गुंतवणूक थांबेल. कारखान्यातीला उत्पादनांची विक्री सुरू होईल. त्यातून कंपनी हळूहळू कर्जमुक्त होईल. अमरावती व इथिओपिया या दोन्ही ठिकाणची भांडवली गुंतवणूक अंतिम टप्प्यात आहे. कंपनी २०२०-२१ पासून कर्जमुक्त होण्यास सुरुवात होईल.

Web Title: Gautam Hari Singhania's special dialogue with Lokmat will take away Rs 2,000 crore from Khadi industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.