डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तपासातील संभ्रम कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 06:56 AM2018-09-09T06:56:58+5:302018-09-09T06:58:02+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक - अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट रोजी पाचवा स्मृतिदिन होता.

 Dr Narendra Dabholkar remains confused about the murder case; | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तपासातील संभ्रम कायम

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तपासातील संभ्रम कायम

googlenewsNext

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक - अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट रोजी पाचवा स्मृतिदिन होता. १८ आॅगस्टला वृत्त आले की, बंगळुरूतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करताना कर्नाटक पोलिसांना डॉ. दाभोलकर हत्येचे धागेदोरे मिळाले असून, औरंगाबादच्या सचिन अंदुरे याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांकडून इतर आरोपींनाही अटक झाली. गोळ्या कोणी झाडल्या, पिस्तूल कोणी पुरविले, प्रशिक्षण कोणी दिले, रेकी कोणी केली याबाबत दावे-प्रतिदावे करण्यात येऊ लागले. डॉ. दाभोलकरांवर कोणी किती गोळ्या झाडल्या यावरही दावे होऊ लागले आहेत. या सगळ्या प्रकरणाकडे बारकाईने नजर ठेवून असलेल्यांमध्येही त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
गौरी लंकेश हत्याप्रकरणात अटक आरोपींच्या तपासात नाला सोपारा येथील मोठा शस्त्रसाठा हाताशी आला़ या प्रकरणातील आरोपी अमोल काळे यांच्या डायरीत अनेकांची नावे होती़ त्यात डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांचेही नाव होते़ त्यातूनच गेली पाच वर्षे डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली; पण उच्च न्यायालयालाही आता अटक केलेले आरोपी तरी नक्की दाभोलकरांच्या हत्येचे आरोपी आहेत ना, याची खात्री करून द्या; अन्यथा खरे आरोपी बाहेर मोकाटच राहतील अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला खडसावले़ या प्रकरणात यापूर्वी जी नावे समोर आली होती़ त्यांचे पुढे काय झाले, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सीबीआयला केला़
डॉ़ नरेंद्र दाभोलकर हे २० आॅगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना, बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल
रामजी शिंदे पुलावर त्यांच्यावर ४ गोळ्या झाडून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांची हत्या केली़
पुणे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी शस्त्रविक्रेते मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना डिसेंबर २०१३ मध्ये अटक केली.
त्यांच्याकडून पिस्तूलमधून गोळ्या झाडून दाभोलकर यांची हत्या केल्याचा दावा, तेव्हा एटीएसने केला होता़ त्यासाठी बॅलेस्टिक रिपोर्टचा आधार घेतला होता़ बॅलेस्टिक तज्ज्ञांनी याच पिस्तुलातून दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याचा निर्वाळा दिला आहे; परंतु त्यांच्याकडून हे पिस्तूल कोणाला विकले गेले होते व ते त्यांच्याकडे परत कसे आले, याविषयी माहिती मिळू शकली नाही़ त्यामुळे त्यांचा या खून प्रकरणात काहीही हात नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले़ त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.
कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात कोल्हापूरच्या साक्षीदाराच्या दाव्यावरून सीबीआयने पनवेलमध्ये छापा घालून सनातनचे साधक डॉ़ वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली़ त्यांच्याकडील छाप्यात सीबीआयला अनेक पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला; परंतु पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याचा तपास पुढे नेईल, असे काहीही पुरावे मिळविण्यात सीबीआयला यश आले नाही़
२०१६ पासून तावडे अटकेत आहे त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले़ तावडेच सूत्रधार असून विनय पवार आणि सारंग आकोलकर यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता़ पवार, अकोलकर यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपये बक्षीसही जाहीर केले़ त्यांची पोस्टर राज्यभरात लावण्यात आली होती. गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासात चिंचवडमधील अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीत महाराष्ट्रातील ११ व कर्नाटकातील १३ अशा २४ जणांची हिटलिस्ट पोलिसांच्या हाती लागली़ त्यात अनेक नावाबरोबरच डॉ़ दाभोलकर यांच्या नावाचा उल्लेख होता़
प्रथम नालासोपारा शस्त्रसाठा आणि त्यानंतर सचिन अंदुरे, शरद कळसकर, वैभव राऊत यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडे चौकशी केली जात होती़ त्यानंतर एकेकाला ताब्यात घेतले जाऊ लागले आहे़
>तावडेच मुख्य सूत्रधार? : डॉक्टर असलेला वीरेंद्रसिंह तावडे पुण्यात येताना सातारा रस्त्यावरील एका केंद्रात मुक्काम करीत असत़ तेथे त्याची सारंग आकोलकर याच्याशी भेट झाली़ त्या पाठोपाठ अमोल काळे, सचिन अंदुरे यांच्या संपर्कात आले़ २०१६ मध्ये वीरेंद्रसिंह तावडे अटकेत आहे; परंतु त्याने अमोल काळे, सचिन अंदुरे यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही़ पोलिसांनी त्याच्या घरी, पनवेल आश्रम याविषयी छापे टाकून अनेक कागदपत्रे, ई-मेल जप्त केले होते़ त्यात या दोघांची नावे आली की नाही़, याचा तपास लागू शकला नाही़ त्यामुळे सीबीआयचा सर्व रोख विनय पवार आणि सारंग आकोलकर यांच्यावरच राहिला; पण ते अजूनही हाती न लागल्याने हा तपास थांबला गेला होता़
>संशयित आयते कसे सापडले? : मडगाव बॉम्बस्फोटात सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे संशयित म्हणून पुढे येताच ते फरार झाले़ ते अजूनपर्यंत सापडले नाही़ त्यांचा कोठेही सुगावा लागलेला नाही़ त्यामुळे सीबीआयने तावडे यांच्यावर दाखल केलेल्या दोषारोपपत्रात त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर गौरी लंकेश हत्या प्रकरणात अमोल काळे याला अटक झाली़ त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीवरून नालासोपारा येथील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला़ वैभव राऊत, शरद कळसकर यांना अटक झाली, तरीही शरद कळसकर याचा साथीदार असलेला सचिन अंदुरे हा मात्र आपल्याच घरी निवांत होते. अमोल काळे याला पकडल्यानंतर, जवळपास काही दिवसांनी कर्नाटक पोलिसांच्या माहितीवरून एटीएसने शरद कळसकर आणि त्यानंतर सचिन अंदुरे यांना पकडले होते़


नव्या कलाटणीने निर्माण झालेले प्रश्न
सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांनी दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचा दावा सीबीआयने केला आहे़ यापूर्वी केलेल्या तपासात दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने गोळ्या झाडल्याचे व एकानेच गोळीबार केल्याचे सांगितले जात होते़ आता दोघांनी गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते़ नेमका कोणता तपास खरा? मनीष नागोरी, विकास खंडेलवाल यांच्याकडील जप्त पिस्तूल नेमके कोणी वापरले होते? दाभोलकर यांना अंदुरे आणि कळसकर हे ओळखत नव्हते, एकाने त्यांना डॉक्टर साहेब नमस्कार ! अशी हाक मारली़ त्यांना दाभोलकर यांची ओळख पटली. त्यांनी त्या माणसाकडे विचारून खात्री केली़ तोपर्यंत दाभोलकर हे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर पोहोचले होते़ गोळ्या झाडल्यावर, त्यांनी दुचाकीवरून पळ काढला़ असे सांगितले जाते़ या नव्या दाव्याने आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, जर डॉक्टरांना ओळखणाऱ्याने त्यांना हाक मारली असेल व त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे विचारणा केली असेल, तर त्या व्यक्तीने आरोपींना जवळून पाहिले असणाऱ तरीही खून झाल्यानंतर ही व्यक्ती पोलिसांकडे का आली नाही?ओंकारेश्वर घाटाजवळ हा प्रसंग घडल्याचे सांगितले जाते व दाभोलकर हे त्यानंतर पुलावर गेल्याचे सांगितले जाते़ प्रत्यक्षात दाभोलकर हे फिरायला बाहेर पडल्यानंतर, पुलावर जाताना नाही, तर पुलावरून परत शनिवारपेठेत येताना त्यांच्यावर गोळीबार झाला आहे़ अगोदर तपासात पुढे आलेली माहिती आणि आता केला जाणारा दावा यात विसंगती दिसून येत आहे़ गौरी लंकेश खून प्रकरणातील एक आरोपी वाघमारे याने खून करण्यापूर्वी २ तास अगोदर आपल्याकडे पिस्तूल आले़ काम झाल्यावर ते पुन्हा काढून घेण्यात आल्याचे सांगितले आहे़ मग, अमोल काळे याला ते पिस्तूल कोणी दिले? अमोल काळे याने सचिन अंदुरे याच्याकडे दिलेले पिस्तूल हे गौरी लंकेश यांच्याबरोबरच दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरल्याचा दावा केला जातो़ मग, जप्त केलेल्या पिस्तुलाचा स्वतंत्र गुन्हा का दाखल केला गेला? सचिन अंदुरे व शरद कळसकर या दोघांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर त्यातील दुसरे पिस्तूल कोठे आहे़? दोघांनी वापरलेली दुचाकी आणि हेल्मेट अजूनही सापडलेली नाही़ सुरुवातीला पोलिसांनी दोघेही हेल्मेट घालूनच मोटारसायकलवरून आले व ते गोळीबार करून पळून गेल्याचे सांगितले होते़ आता कळसकर हा चालतच त्यांच्या पाठोपाठ आला व दाभोलकर यांना गाठून त्यांच्यावर गोळीबार केला़ त्यानंतर अंदुरे मोटारसायकल घेऊन तेथे आला व त्यानेही गोळ्या झाडल्या़ त्यानंतर त्यांनी पळ काढला असे सांगितले जात आहे़ त्यामुळे नेमका खरा तपास कोणता?
>हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
२० आॅगस्ट २०१३ :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या़
३० आॅगस्ट २०१३ :
सुमारे ८ कोटी फोन कॉल,
ई-मेलची तपासणी सुरू.
२ सप्टेंबर २०१३ :
संशयितांचे रेखाचित्र तयार,
१७ जणांची चौकशी.
१९ डिसेंबर २०१३ :
मनीष नागोरी आणि विकास खंडेलवालला अटक व कोठडी.
१३ मार्च २०१४ :
नागोरी, खंडेलवालची प्रत्यक्षदर्शीकडून ओळखपरेड.
९ मे २०१४ :
गुन्हे शाखेकडून सीबीआयकडे
तपास सोपविला.
३ डिसेंबर २०१४ :
दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती.
३१ मे २०१६ :
सीबीआयचे वीरेंद्र तावडे
(पनवेल) व सारंग आकोलकर
(पुणे) यांच्या घरी छापे.
११ जून २०१६ :
वीरेंद्रसिंह तावडे याला अटक.
१४ जून २०१६ :
तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा
३० नोव्हेंबर २०१६ :
तावडे याच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
२१ मे २०१८ :
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह ५ जणांना कर्नाटक एसआयटीने अटक केली़
६ जुलै २०१८:
न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला.
१० आॅगस्ट २०१८ :
मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना एटीएसने अटक केली़
१८ आॅगस्ट २०१८ :
एटीएसने चौकशी केल्यानंतर,
सोडून दिल्यावर सीबीआयने सचिन अंदुरे याला अटक केली़ प्रत्यक्ष गोळ्या झाडणाºयाला अटक केल्याचा सीबीआयचा दावा.
३१ आॅगस्ट २०१८ :
अमित दिगवेकर आणि
राजेश बंगेरा यांना अटक.
४ सप्टेंबर २०१८ :
शरद कळसकरने दोन गोळ्या झाडल्याचा सीबीआयचा दावा.
>पुरावे शोधण्याचे
सीबीआयपुढे आव्हान
मनीष नागोरी व विकास खंडेलवाल
डॉ. दाभोलकर यांची
हत्या करणाºयांना पिस्तुलाची
विक्री केल्याचा आरोप मनीष
नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्यावर ठेवण्यात आला होता. डिसेंबर २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. ठोस पुरावे न मिळाल्याने ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल न झाल्याने त्यांची सुटका झाली. पोलिसांनी खटला बंद करण्यासंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करावा, असा विनंती अर्ज आरोपींनी केला आहे.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे : सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. फरार विनय पवार आणि सारंग आकोलकर या दोघांशी त्याचा संबंध होता. आरोप निश्चिती होत नसल्याने जामीन मिळण्यासाठी तावडे याने अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तावडेच्या विरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. पवार आणि आकोलकर यानेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे; मात्र दोन्ही फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
सचिन अंदुरे : नालासोपारा स्फोटके प्रकरणात अटक
वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा
गोंधळेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने सचिन अंदुरेला १८ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्याकडील पिस्तूल हे अमोल काळे यांने दिले होते व त्याचा वापर लंकेश यांच्या खुनातदेखील झाला होता, असाही दावा आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर त्याने हत्येचा कट रचला होता.त्याला अमोल काळे याने पिस्तूल दिले होते. ते रोहित रेगे याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. १४ दिवसांची सीबीआय कोठडी पूर्ण झाल्यानंतर, सध्या अंदुरे हा न्यायालयीन कोठडीत आहे.
अमित दिगवेकर : दिगवेकर यांने अमोल काळेच्या मदतीने डॉ. दाभोलकर आणि लंकेश यांचा खून झालेल्या ठिकाणांची रेकी केली होती. डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला कुठे आणि किती वाजता जायचे याची माहिती त्याने पुरवली होती. दिगवेकर हिंदू जनजागृती संघाचा साधक आहे. तो गेल्या १५ वर्षांपासून गोवा आश्रमात राहत असून, डॉ. तावडे याच्याशी त्याचा जवळचा संबंध आहे. काळे, दिगवेकर आणि राजेश बंगेरा हे तीनही आरोपी हे अंदुरे याच्याशी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संर्पकात होते. त्याला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे.
राजेश बंगेरा :
अंदुरे आणि कळसकर यांना राजेश बंगेराने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तो कर्नाटक येथील शासकीय कर्मचारी असून, एका राजकीय व्यक्तीचा स्वीय सहायक म्हणूनही काम पाहत. लंकेश यांच्या हत्या प्रकरणातून बंगेराला सीबीआयने डॉ. दाभोलकर खून प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यालादेखील १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.
अमोल काळे :
गौरी लंकेश प्रकरणात काळे हा मुख्य आरोपी असून, डॉ. दाभोलकरांच्या गुन्ह्यात त्याला सीबीआयने अटक केली आहे. अंदुरे त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल काळे याने पुरवले होते. ते औरंगाबाद येथून जप्त करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर हत्येतही मास्टरमाइंड असावा, असा संशय आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती. काळे याला १४ सप्टेंबरपर्यंत कोठडीत आहे.
शरद कळसकर : डॉ़ दाभोलकर यांच्यावर शरद कळसकरने दोन गोळ्या झाडल्या होत्या, असे सचिन अंदुरे याने सांगितले आहे. तो शस्त्रे हाताळण्यात व बॉम्ब बनविण्यात पारंगत होता. वैभव राऊत याच्याकडून शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. त्याच्या संपर्कात असलेल्या कळसकरला अटक करण्यात आली आहे. अंदुरे हा कळसकर याचा खास मित्र आहे. वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्याकडे अनेक नंबर प्लेट सापडल्या. १० सप्टेंबरपर्यंत कोठडी आहे.

Web Title:  Dr Narendra Dabholkar remains confused about the murder case;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.