निर्णय स्वागतार्ह तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 06:31 AM2018-08-31T06:31:26+5:302018-08-31T06:33:11+5:30

नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़

The decision is still welcome ... | निर्णय स्वागतार्ह तरीही...

निर्णय स्वागतार्ह तरीही...

Next

नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागात व छोट्या शहरांमध्ये राहणाºया विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करता यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ केंद्र सरकारचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे व त्यासाठी केंद्र सरकारचे कौतुकच करायला हवे़ मात्र हा निर्णय घेऊन केंद्र सरकारची जबाबदारी संपत नाही़ कारण सध्या शिक्षणाचा बाजार झाला आहे़ अव्वाच्या सव्वा शुल्क, आश्वासनांची खैरात केली जाते़ मात्र प्रत्यक्षात कामगिरी शून्य, अशा अनेक गोष्टी शिक्षण क्षेत्रात होत आहेत़ या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही होत आहे़ अशा परिस्थितीत केंद्र सरकार मोफत कोचिंग क्लास देणार असेल तर त्याचा दर्जाही उत्तम हवा़ क्लासेस घेणारे शिक्षक उच्च शिक्षित व तज्ज्ञ असायला हवेत़ कोचिंग क्लास होत असलेल्या जागी मूलभूत सुविधाही हव्यात़ विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतील असे तेथील वातावरण हवे़ तरच हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल़ अन्यथा या कोचिंग क्लासचेही बाजारीकरण होईल़ आपली शिक्षण पद्धती जुनाट आहे़ रोजगार देणारी नाही, अशी ओरड होतच असते़ तरीही नवनवीन प्रयोग करून सरकार शिक्षण संस्था टिकविण्याचा प्रयत्न करत असते़ शाळा, महाविद्यालयांत उत्तम शिक्षण दिले जाते, अशी खास जाहिरातबाजीही होते़ मात्र तरीही प्रत्येक पालक खासगी कोचिंग क्लासचा पर्याय निवडतो़ पालकांच्या या मानसिकतेमुळे खासगी कोचिंग क्लासची चलती झाली़ खासगी कोचिंग क्लाससाठी पालक लाखो रुपये शुल्कही मोजतात़ असे असताना नीट व जेईईसाठी घेतल्या जाणाºया कोचिंग क्लासचा दर्जा खालावलेला असेल तर त्याचा टिकाव लागणे कठीण आहे़ यातील दुसरी बाब म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल याचे निकष ठरवायला हवेत़ तेथे आरक्षणाची मागणी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी़ गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही तर या योजनेला भ्रष्टाचाराचे गोंदण लागेल़ त्यामुळे त्याची काळजीही सरकारने घ्यायला हवी़ तसेच कोचिंग क्लासची प्रक्रिया सुलभ असणेही आवश्यक आहे़ ग्रामीण भागात व छोट्या शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला याची माहिती मिळायला हवी़ तरच मोफत कोचिंग क्लासची संकल्पना फलदायी ठरेल अन्यथा त्याचेही बाजारीकरण व्हायला वेळ लागणार नाही़ ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थी आधीच उच्च शिक्षणाची स्वप्ने पहात नाही़ काही जण छातीवर दगड ठेवूनच या शिक्षणपद्धतीत उतरतात़ कमी मनोबलामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहचत नाही़ खरे तर त्यांची पुरेशी क्षमता असते, परंतु योग्यवेळी योग्य मार्गदर्शन नसल्याने ती धडपडतात, अपयशी ठरतात़ त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी केंद्राची ही योजना सुवर्णसंधी ठरू शकते़ या योजनेतून खºया अर्थाने मातीतल्या विद्यार्थ्यांना मोठी झेप घेण्याची संधी प्राप्त होणार आहे़ प्रश्न आहे, तो फक्त योग्य अंमलबजावणीचा़ सध्या बाजारातील खासगी कोचिंग क्लासेसनी ढीगभर जाहिराती करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे़ त्यांच्या यशापयशाचा आलेख मांडणे अवघड आहे़ तरीही केंद्र सरकारच्या या योजनेमुळे सध्याच्या कोचिंग क्लासेसचे धाबे दणाणले असेल़ पण त्यातून निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्याचा गुणवंत विद्यार्थ्यांना फायदा झाला तरच तो खरा सुदिन ठरेल़ अर्थात आपल्याकडे अनेक योजना कागदावर यशस्वी ठरतात़ प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळी त्याचा बोजवारा उडतो़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणारी ही योजना फलदायी ठरो, अशी अपेक्षा तूर्त व्यक्त करायला हरकत नाही़

Web Title: The decision is still welcome ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.