दृष्टिकोन - शहानिशा सोशल मीडियावरील फेकमफेकीची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:54 AM2019-01-07T06:54:12+5:302019-01-07T06:54:39+5:30

वैयक्तिक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, टिष्ट्वटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल.

Approximation - Shaihishisha's tweet on social media | दृष्टिकोन - शहानिशा सोशल मीडियावरील फेकमफेकीची

दृष्टिकोन - शहानिशा सोशल मीडियावरील फेकमफेकीची

Next

डॉ. दीपक शिकारपूर 

वैयक्तिक आणि व्यवसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवादमाध्यमे म्हणजे फेसबुक, टिष्ट्वटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीची जागा ‘घरोघरी स्मार्टफोन व सोशल मीडिया’ने घेतली आहे. शाळा, कॉलेजनंतर जगभर विखुरलेल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक पुन्हा भेटवणारे आणि उद्योग-व्यवसायाच्या नवनवीन (व कधीकधी अनपेक्षित देखील) संधी मिळवून देणारे हे संवादमंचसुद्धा त्रासदायक ठरू शकतात, याला कारण म्हणजे अनेक व्यक्ती या प्रतिबंध नसलेल्या माध्यमाचा गैरवापर करत आहेत.

नुकताच एका वरिष्ठ केंद्रीय मंत्री व त्यांची तरुण मुलगी असा फोटो अनेक समाज माध्यमात व्हायरल झाला. नंतर असे वृत्त आले की, सदर फोटोमधील मुलगी ही त्यांची नसून एक भारतीय सेनेतील अधिकारी आहे, अशा अनेक खोट्या बातम्या आजकाल पसरत आहेत. फेक न्यूज म्हणजेच खोट्या बातम्या. याला ‘होक्स’ असेही नाव आहे. अशा बातम्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. राजकारण आणि अर्थकारणापासून आज पृथ्वीवर सूर्याकडून कॉस्मिक रेजचा मारा होणार आहे, तरी सावध राहावे, यापर्यंत काहीही यात असू शकते.
अशा बातम्यांना मसाला व्हॅल्यू उर्फ टीआरपी जास्त असल्याने, सोशल मीडियावर त्या अतिशय झपाट्याने पसरतात. रशिया, मॅसेडोनिया, रुमानिया आणि काही प्रमाणात अमेरिका येथून या प्रकारच्या बातम्या उत्पन्न केल्या जातात आणि भारतासहित जर्मनी, इंडोनेशिया, स्वीडन, अमेरिका, फिलिपीन्स अशा देशांना यातून राजकीय किंवा आर्थिक अफवांना सामोरे जावे लागले आहे.

फेक न्यूजबाबतचे आपल्याकडचे एकच उदाहरण पुरेसे बोलके आहे. ८ नोव्हेंबर, २0१६ला आपल्याकडे नोटाबंदी लागू झाली आणि जुन्या ५00 रु. व १000 रु.च्या नोटांऐवजी सरकारने दोन हजारांची नवी नोट सादर केली. या नव्या नोटेत एक सूक्ष्म चिप बसवलेली असून, तुम्ही नोटा जमिनीत खोलवर पुरून ठेवल्यात, तरी त्या ट्रॅक होऊ शकतात, अशी बातमी पसरली. नोटाबंदीचा निर्णय काळ्या पैशाच्या संदर्भात घेतला असल्याचे सरकारने सांगितल्याने हिला अधिकच वेग आला. त्या वेळी भारतात स्मार्टफोन व्हॉट्सअपचे सुमारे पाच कोटी वापरकर्ते होते. त्यांपैकी बहुतेकांनी ही बातमी फॉरवर्ड केली. खुद्द अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बॅँकेने या बातमीचे निराकरण करूनही ती बरेच दिवस चर्चेत राहिली.

खोट्या बातम्यांची शहानिशा करणे, सर्वसामान्य वापरकर्त्याला सोपे आहे. यासाठी फक्त आपल्या संगणकाचे किंवा स्मार्टफोनचे नेट कनेक्शन (उर्फ डेटापॅक) वापरावे लागते, तेही अगदी थोडा वेळ. ही तपासणी करण्याचे मूलत: दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे बातमीचे मूळ शीर्षक (किंवा त्यातील महत्त्वाचे शब्दप्रयोग) कॉपी करून शोध-पट्टीत पेस्ट करायचे. आपल्या शंकेचे योग्य उत्तर बहुधा काही सेकंदांतच मिळते, दुसरा मार्ग म्हणजे असा संस्थांच्याच साइटवर जायचे आणि तिथे हाच प्रश्न टाइप करायचा. खोट्या बातम्या पसरविण्यात (जगभरचेच) राजकीय पक्ष आणि त्यांच्या संलग्न संघटना आघाडीवर आहेत, हे वेगळे सांगायचीही गरज नाही, परंतु सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्येही एकंदरीने जागरूकता वाढत चालल्याने बातम्यांची सत्यता पडताळणाऱ्या या आणि अशा वेबसाइट्सवरचा ट्रॅफिकदेखील वाढला आहे, विशेषत: गेल्या पाच-सात वर्षांत, असे निरीक्षण आहे.  अर्थात, वापरकर्त्यांनीही बातम्यांची पडताळणी करताना स्वत:च्या अंतर्मनाचे ऐकून केवळ विशिष्ट बातम्याच न तपासता न्यूट्रल म्हणजे संतुलित मानसिकता ठेवावी.


( लेखक विज्ञानविषयक तज्ज्ञ आहेत )

Web Title: Approximation - Shaihishisha's tweet on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.