अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा : श्रीकृष्ण बेडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:05 AM2018-12-06T05:05:46+5:302018-12-06T05:05:53+5:30

मूळचे गिरगावकर श्रीकृष्ण बेडेकर शिक्षणानिमित्त मध्य प्रदेशात गेले आणि ‘इंदूर’सारख्या ऐतिहासिक कीर्तीच्या शहरात स्थायिक झाले.

All-round talent all-round diamond: Shrikrishna Bedekar | अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा : श्रीकृष्ण बेडेकर

अभिजात प्रतिभेचा अष्टपैलू हिरा : श्रीकृष्ण बेडेकर

googlenewsNext

- डॉ. निरंजन माधव 
मूळचे गिरगावकर श्रीकृष्ण बेडेकर शिक्षणानिमित्त मध्य प्रदेशात गेले आणि ‘इंदूर’सारख्या ऐतिहासिक कीर्तीच्या शहरात स्थायिक झाले. विविध कलांचा प्रपंच त्यांनी तिथेच थाटला. आयुष्यभर कलेलाच जीवनसंगीनी मानून मराठी संस्कृतीवर, माणसांवर प्रेम करीत जगणारा हा अवलिया आज पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी श्रीकृष्ण बेडेकर हे मराठी सारस्वताला पडलेले सुंदर स्वप्न होय. साहित्यातील विविध प्रकार हाताळतानाच चित्र, रांगोळी, गायन, संपादन याही क्षेत्रांत आपल्या अभिजात प्रतिभेची अमीट मुद्रा उमटविणारे बेडेकर भल्याभल्यांना ‘कोडे’ वाटते. त्यांचे अतिशय सुंदर असे हस्ताक्षर, पत्रसारांश शब्ददर्वळ, आध्यान यासारखे साक्षेपी संपादन केलेले अंक व सर्वदूर माणसं हेरून त्यांना कायम जोडून घेण्याची त्यांची स्नेहशीलता असे असंख्य पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इंद्रधनूच्या रंगांप्रमाणे परस्परात सामावून गेलेले दिसतात.
पत्रकार, संपादक, चित्रकार, कवी, गायक, लेखक, रांगोळीकार म्हणून श्रीकृष्ण बेडेकर हे नाव जाणकार व्यक्तीपर्यंत कधीचेच पोचले आहे. बेडेकर एक कलंदर व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. वेगवेगळ्या दिशांनी त्यांनी स्वत:ला संपन्न समृद्ध केले आहे. महाराष्टÑाबाहेर राहून अखंडितपणे त्यांनी मराठी भाषा व संस्कृतीची निरलसपणे भक्ती केली. कुठल्याही मानसन्मानाच्या पदांची लालसा न बाळगता व्रतस्थ निष्ठेने त्यांची मराठी सारस्वताची पूजा अजूनही त्याच भक्तीभावाने अव्याहत सुरूच आहे.
बेडेकर सरांशी माझी पहिली भेट झाली ती फोनवर २००९-१० च्या सुमारास. मी वेगवेगळ्या प्रतिष्ठित दिवाळी अंकांना कविता पाठवितो तशा त्या ‘शब्ददर्वळ’लासुद्धा त्या वर्षी पाठविल्या. आणि ध्यानीमनी नसताना माझी कविता आवडल्याचे सांगायला या व्रतस्थ दिलदार बाण्याच्या माणसाने मला मुद्दामहून फोन केला. या पहिल्या संभाषणातच त्यांनी मला स्वत:च्या मैत्रीसूत्रात कायमचे बांधून घेतले. ‘‘बेडेकरांनी आयुष्यात फारच अल्पकाळ चाकऱ्या केल्या व शेवटी १९८० मध्ये स्वत:च्या ‘अलर्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग’ संस्थेत रमले. तरी त्यांची पत्रकारितेपासूनच्या इतर विविध क्षेत्रांतली मुशाफिरी अद्यापही अखंड चालू आहे.
कविवर्य श्रीकृष्ण बेडेकरांचे चाहते महाराष्टÑभर व महाराष्टÑाबाहेर पसरलेले आहेत. श्री. बेडेकरांबद्दल ‘चतुरस्र बेडेकर’ या लेखात डॉ. सुरेश चांदवणकर म्हणतात, ‘‘बेडेकरांनी आयुष्यात फारच अल्पकाळ चाकºया केल्या व शेवटी १९८० मध्ये स्वत:च्या ‘अलर्ट अ‍ॅडव्हर्टायझिंग’ संस्थेत रमले. तरी त्यांची पत्रकारितेपासूनच्या इतर विविध क्षेत्रांतली मुशाफिरी अद्यापही अखंड चालू आहे. १९९४ मध्ये त्यांनी ‘जास्वंदी प्रकाशन’ची स्थापना केली व किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीमती डॉ. प्रभा अत्रे यांच्या २०० बंदिशींचा पहिला संदर्भ ‘स्वरांगिनी’ प्रकाशित केला. त्या वेळी त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांच्याशी परिचय असलेल्यांनी बघितले आहेत. संदर्भग्रंथ म्हणून विविध संदर्भालयांमध्येच अशा प्रकारची पुस्तके विराजमान होत असतात. हा व्यवहार पूर्णपणे आतबट्ट्याचा होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही हा खटाटोप त्यांनी केला. सुदैवाने संशोधक, रसिक, अभ्यासक या सर्वांनीच त्यांचे चांगले स्वागत केले. इतके की, त्याची दखल घेण्याकरिता बेडेकरांना ‘पत्र सारांश’चा स्वतंत्र ‘स्वर साधना’ विशेषांक (एप्रिल १९९८) काढावा लागला.’’
बेडेकरांचे व्यक्तिमत्त्व मला एका परिगतप्रज्ञ तपस्वी साधकागत वाटते. प्राचीन परंपरेतील ऋषीप्रमाणे त्यांची ज्ञान कलासाधना अविरत चाललेली असते. ते आपल्या जवळच्या सर्वांनाच अधिकारवाणीने काहीतरी सांगत असतात. सत्य कटू असले तरीही ते बोलून दाखवितात.
बेडेकरांच्या व्यक्तिमत्त्वात प्रत्येक बाबतीत परिपूर्णतेच्या आग्रहाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. मग ते हस्ताक्षर असो, शिल्प असो, रांगोळी असो की धान्य रांगोळी असो... त्या-त्या कलासाधनेत त्यांनी पूर्णपणे आपला प्राण ओतलेला दिसून येतो. कुठलीही गोष्ट सर्वांगसुंदर व इतरांना प्रसन्नता देणारी असावी, अशी त्यांची उत्कट इच्छा असते.
‘अंतर्याम’ या त्यांच्या कवितासंग्रहाला कवयित्री इंदिरा संत यांची मर्मग्राही प्रस्तावना लाभली आहे. या कवितासंग्रहातील सौंदर्य सामर्थ्यस्थळे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे या प्रस्तावनेतून अधोरेखित केलेली आहेत.
महाराष्टÑाबाहेर इंदुरसारख्या दूरस्थ शहरात राहून त्यांचे हे मराठी भाषेबद्दलचे आस्थापूर्ण उपक्रम खरेच वाखाणण्यासारखे आहेत. पण महाराष्टÑातील बरेच लोक आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करते! आकाशवाणी व मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘पत्र सारांश’ उपक्रमावर स्वतंत्र कार्यक्रम सादर झालेले आहेत. ‘पत्र सारांश’ ही अनेकांच्या मर्मबंधनातील ठेव. पत्र सारांशचे अंतर्बाह्य देखणे अंक अनेकांनी आस्थेने संग्रही ठेवलेले आहेत. हा ‘माणूस’ अनेकांनी आपल्या हृदयात ‘संग्रही’ साठवून घेतलेला आहे. प्रेमाच्या आदराच्या कोंदणात हा हिरा घट्ट जडवून घेतला आहे. अशा या गुणनिधी सारस्वताला माझे विनम्र अभिवादन!
जीवेत शरद: शतम्

Web Title: All-round talent all-round diamond: Shrikrishna Bedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.