नायब तहसीलदाराला लाचेची मागणी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 18:36 IST2017-08-02T18:34:46+5:302017-08-02T18:36:22+5:30
१५ हजारांची रक्कम : लिपीकही ताब्यात

नायब तहसीलदाराला लाचेची मागणी भोवली
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : शेती बिनशेती (एनए) करण्याचा प्रस्ताव शिफारशीसह पुढे पाठविण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणाºया धुळे ग्रामीणचा नायब तहसीलदार हरिष बजरंग गुरव (३८) आणि लिपीक प्रदीप शरद देवरे (२७) यांना १५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तक्रारदार यांची धुळे तालुक्यातील जुनवणे गावाच्या शिवारात शेत जमीन आहे़ तक्रारदार यांनी सदर शेत जमीन बिनशेती (एनए) होण्याकामी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात २०१५ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता़ त्यानंतर तक्रारदार यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी धुळे ग्रामीणचे तहसीलदार यांच्या कार्यालयात जावून बिनशेती प्रकरणासंदर्भात नायब तहसीलदार गुरव यांना भेटून विचारणा केली़ प्रस्ताव शिफारशीसह वरिष्ठांकडे लवकर पाठवावा, अशी विनंती केली होती़ त्यांनी त्यांचा लिपीक प्रदीप देवरे याच्याकडे पाठविले होते़ तक्रारदार यांनी लिपीक देवरे यांना भेटून त्यांच्याशी कामासंदर्भात चर्चा केली़ यातून १५ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली़ पण, तक्रारदार यांना मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली़ सदरहू लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाल्याने नायब तहसीलदार हरीष गुरव आणि लिपीक प्रदीप देवरे यांच्याविरुध्द २ आॅगस्ट रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात अधिनियम १९८८ चे ७, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सदरहू कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकातील हेकॉ जितेंद्रसिंग परदेशी, पोलीस नाईक कैलास शिरसाठ, सतीष जावरे, कैलास जोहरे, कृष्णकांंत वाडीले, देवेंद्र वेंदे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, पोकॉ प्रशांत चौधरी, संदिप सरग, संतोष हिरे, संदीप कदम यांनी ही कारवाई केली़