राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक : राणा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 09:42 AM2020-02-23T09:42:18+5:302020-02-23T09:42:34+5:30
राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
उस्मानाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. कर्जमाफी योजनेची अद्याप अंमलबजावणी नाही. पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. तसेच राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असल्याचा आरोप करत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
पाटील म्हणाले की, या सरकारने किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. मात्र, सध्याचे चित्र पाहिल्यानंतर हा कार्यक्रम कुठेच दिसून येत नाही. मंत्रिमंडळातील प्रत्येक जण वेगळच काही तरी बोलत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २५ हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर या मागणीचा त्यांना विसर पडला असल्याच पाटील म्हणाले.
राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी ८ हजार रुपये मदतही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आजवर शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबतही सरकारमधील मंडळी चकार शब्द काढायला तयार नाहीत. जी कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यातही अटी-शर्थीचा भरणा आहे. या योजनेतून केवळ दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. उर्वरित शेतक-यांनाही दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कुठलीही योजना जाहीर झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाताना दिसत नाहीत. एकूणच या सरकारचा कारभार सर्वसामान्यांची निराशा करणारा आहे. त्यामुळे अशा सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा तसेच तहसील स्तरावर सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.